

Sharad Pawar Sunetra Pawar's oath: दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज सायंकाळी साडेपाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार या राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत याबाबत कोणतीही चर्चा माझ्यासोबत केलेली नाही असं शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं होतं. शरद पवार या निर्णयावरून नाराज असल्याच्या देखील चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, शरद पवार यांनी आमच्या कुटुंबातील कोणीही या शपथविधीला जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणि पर्यायानं पवार कुटुंबियातील राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
शरद पवार यांनी बारामतीमधील आपल्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या निधानाला फक्त ४ दिवसच झाले असताना शपथविधी होतोय याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी, 'हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी यात पुढाकार घेतला आहे. त्यांनी त्यांच्या प्राथमिकता स्पष्ट केल्या आहेत.'
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री छगन भुजबळ हे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाचा निर्णय कळवला होता. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात येईल आणि उपमुख्यमंत्रीपद देखील त्यांच्याकडेच देण्यात येईल असं स्पष्ट केलं होतं. यासाठी आज सुनेत्रा पवार आणि मुलगा जय हे दोघेही मुंबईत पोहचले होते. अन् नुकतेच सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड देखील झाली आहे. त्या सायंकाळी साडेपाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर शरद पवार यांना विचारणा झाल्यावर ते म्हणाले, 'अजित पवार यांचे अपघाती निधन हे खूप धक्कादायक आहे. कोणाला तरी अजित पवारांची जगा घ्यावी लागेल. त्यांचे काम पुढे न्यावे लागेल. तसेत लोकांमध्ये विश्वास कायम ठेवावा लागेल.'