

Sharad Pawar On Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या पदावर किंवा पक्षाच्या नेतृत्वाबाबत त्यांच्या राष्ट्रवादी गटाकडून अत्यंत वेगाने निर्णय घेतले जात आहेत. मात्र, या प्रक्रियेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना विश्वासात घेतले नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, यामुळे पवार कुटुंबात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे.
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा घाई गडबडीत घेतला गेल्याचे सांगितले. सुनेत्रा पवारांबाबत हा निर्णय एवढ्या घाई गडबडीत का घेतला गेला हे मला माहिती नाही असं सांगितलं. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा ही गेल्या चार महिन्यांपासून सुरू होती असंही शरद पवार यांनी सांगितलं. जयंत पाटील आणि अजित पवार हे चर्चा करत होते असं देखील शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
याचबरोबर शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय १२ जानेवारीलाच घोषित करण्यात येणार होता असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मात्र आता त्यात खंड पडला आहे असं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी सुनेत्रा पवारांबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करत त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत याची माहिती नाही असं स्पष्ट केलं. पवारांनी नरेश अरोरा कोण मला माहिती नाही असं देखील म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील काही महत्त्वाचे निर्णय घेताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. मुंबईमध्ये काल पार पडलेल्या बैठकांमध्ये ज्या पद्धतीने घाईघाईने प्रक्रिया राबवली गेली, त्याबद्दल पवार कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "इतकी घाई करण्याची गरज नव्हती," अशी भावना कुटुंबातील काही वरिष्ठ सदस्यांची असल्याचे समजते. एकीकडे दोन्ही गट एकत्र येण्याच्या किंवा विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अशा प्रकारे परस्पर निर्णय घेतले जात असल्याने संभ्रम वाढला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर काल रात्री बारामतीतील 'गोविंदबाग' या निवासस्थानी शरद पवार यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील बदलत्या घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या गटाकडून ज्या पद्धतीने पुढची पावले उचलली जात आहेत आणि प्रशासकीय पातळीवर ज्या हालचाली घडत आहेत, त्याबद्दल शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचे समजते.
अजित पवारांच्या पश्चात पक्षाची धुरा कोणाकडे जाणार आणि सुनेत्रा पवारांची भूमिका काय असेल, यावर सध्या सस्पेन्स कायम आहे. मात्र, शरद पवारांना डावलून निर्णय घेतले जात असल्याच्या वृत्तामुळे राजकारणात पुन्हा एकदा संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. मुंबईतील बैठकांनंतर आता बारामतीतून शरद पवार काय पवित्रा घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.