Khadakwasla Dam : गावांमधील सांडपाणी थेट खडकवासला धरणात

Khadakwasla Dam : गावांमधील सांडपाणी थेट खडकवासला धरणात
Published on
Updated on

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरण परिसरातील वेल्हे व हवेली तालुक्यांमधील गावांतील सांडपाणी व कचरा थेट धरणात मिसळत आहे. या भागातील कंपन्या व हॉटेलचे सांडपाणीदेखील धरणात येत असल्याचे गंभीर चित्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या पाहणीत पुढे आले.

खडकवासला धरणातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी नुकतीच खडकवासला धरण क्षेत्राची पाहणी केली. चव्हाण म्हणाले, 'धरणाच्या पाण्यात मिसळत असलेले सांडपाणी, कचर्‍यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांची लवकरच बैठक घेऊन त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे.'

गोर्‍हे बुद्रुक, डोणजे, गोर्‍हे खुर्द, खानापूर, मालखेड, वरदाडे, निगडे, ओसाडे, आंबी, सोनापूर, पानशेत, कुडजे, आगळंबे, खडकवाडी, सांगरूण, बहुली, मांडवी व इतर आजूबाजूच्या गावांतील सांडपाणी, कचरा धरणाच्या पाण्यात मिसळत आहे. तसेच परिसरातील हॉटेल, फार्महाऊस, रिसॉर्ट व कंपन्यांचे सांडपाणीही धरणाच्या पाण्यात जात आहे. अलीकडच्या दहा- बारा वर्षांत लोकसंख्या वाढल्याने प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे.

पाहणी दौर्‍यात जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट, प्रवीण शिंदे, हवेली बाजार समितीचे संचालक दत्तात्रय पायगुडे, देखरेख संघाचे संचालक लक्ष्मण माताळे, माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, खानापूरचे माजी सरपंच शरद जावळकर, नारायण जावळकर, सुशांत खिरीड, गोर्‍हे बुद्रुकच्या सरपंच शारदा खिरीड, नरेंद्र खिरीड आदी सहभागी झाले होते.

आमदारांनी लक्ष वेधूनही उपाययोजना ठप्प

आमदार भीमराव तापकीर यांनी मैला, सांडपाण्यामुळे खडकवासला धरणाचे पाणी प्रदूषित होत आहे, याकडे शासनाचे लक्ष वेधूनही अद्याप उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. तापकीर म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून याबाबत थेट विधिमंडळात, तसेच संबंधित विभागाचे लक्ष वेधून उपाययोजनांची मागणी केली. मात्र, उपाययोजना करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news