सरकारी पैशांवर लंडनमध्ये मजा मारणार्‍यांनी शहाणपणा शिकवू नये! : आशिष शेलार | पुढारी

सरकारी पैशांवर लंडनमध्ये मजा मारणार्‍यांनी शहाणपणा शिकवू नये! : आशिष शेलार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या परदेश दौर्‍यावर टीका करणारे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बाप आजारी असताना सरकारी पैशांवर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते, असा टोला शेलार यांनी लगावला आहे. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे; पण त्याचा कळस गाठू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौर्‍यावरील खर्चावर आक्षेप नोंदवला होता. त्याबाबत त्यांनी शासन निर्णयातील मुद्द्यांकडेही लक्ष वेधले होते. त्यावर शेलार यांनी ट्विट करत चांगलाच समाचार घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला आहे. त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते.

अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत जाणार्‍या अधिकार्‍यांचा खर्च केलेला आहे. जपान दौर्‍यात फडणवीस यांनी किती गुंतवणूक आली, याची संपूर्ण टाईमलाईन त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. मोठी गुंतवणूक त्यांच्या या दौर्‍यामुळे आली आहे. वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्यावी, असा टोला शेलार यांनी लगावला आहे.

Back to top button