तब्बल साडेसात टन फराळाची परदेशवारी

तब्बल साडेसात टन फराळाची परदेशवारी

पुणे : अमेरिकेत अंदाजे दोन टन, ऑस्ट्रेलियामध्ये दीड टन, सिंगापूरमध्ये अर्धा टन, असा फराळ जाणार आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण, हे खरंय. यंदा दिवाळीनिमित्त विविध देशांमध्ये फराळ पाठवायला सुरुवात झाली असून, खासकरून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक फराळ पाठविण्यात येणार आहे. पुणेकरांनी परदेशात राहणार्‍या नातेवाइक, आप्तेष्टांसाठी चविष्ट फराळ पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कुरिअर कंपन्यांकडे फराळाचे पार्सल पाठविण्यासाठी गर्दी वाढली आहे.

मागील वर्षी दिवाळीमध्ये अंदाजे सहा टन फराळ पाठविण्यात आला होता, यंदा साडेसात टन फराळ पाठविण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परदेशात राहणार्‍या मराठीभाषकांसाठी पुण्यात राहणारे नातेवाइक अनारसे, चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळे, करंजी अन् शेव, या फराळाचा बॉक्स कुरिअर कंपन्यांद्वारे पाठवत आहेत. सिंगापूर, इंडोनेशिया, कॅनडा, जर्मनी अशा विविध देशांमध्ये त्या-त्या देशांचे नियम पाळून फराळाचे पार्सल पाठविण्यात येत आहेत.

काही कुटुंबांकडून महिला बचत गट, मिठाईवाले, घरगुती महिला व्यावसायिक, केटरिंग व्यावसायिक यांच्याकडून रेडीमेड फराळ विकत घेऊन परदेशातील आप्तेष्ठांना पाठविला जात आहे, तर काही जण घरीच तयार केलेला फराळ पाठवत आहेत. जवळपास एक ते सहा किलोचा फराळ परदेशात पाठविला जात आहे. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये दरवर्षी सर्वाधिक फराळ पाठविला जातो. यंदाही तेच चित्र असणार आहे. महिला व्यावसायिकांच्या करंजी, अनारसे, शेव, चिवडा, चकली, शंकरपाळे या तयार फराळाला मागणी आहे.

सहा ते दहा किलोपर्यंतचा फराळ

कुरिअर कंपन्यांकडून खास पार्सल बॉक्स
एक किलो फराळासाठी 700 ते 1000 रुपये शुल्क
40 कुरिअर कंपन्या देतात पार्सलसेवा
रेडीमेड फराळाला मागणी
अधिकृत संकेतस्थळासह सोशल मीडिया आणि दूरध्वनीद्वारे बुकिंग
पार्सलसाठी मागणी वाढल्याने आठ ते दहा दिवसांत पोहचताहेत पार्सल

दररोज 90 ते 95 पार्सल परदेशात

कुरिअर कंपनीचे संचालक दीपक नाडकर्णी म्हणाले, अनेक लोक आमच्याकडे पार्सल पाठविण्यासाठी येत असून, साधारणपणे 90 ते 95 पार्सल रोज विविध देशांमध्ये पाठवत आहोत. फराळासह परदेशात राहणार्‍या आप्तेष्टांसाठी नवीन कपडे आणि इतर साहित्यही पाठविण्यात येत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news