अंजिराच्या खट्ट्या बहाराला पाण्याचे वेध | पुढारी

अंजिराच्या खट्ट्या बहाराला पाण्याचे वेध

रामदास डोंबे

खोर : दौंड तालुक्यातील अंजिराचे उत्पादन घेणारे खोर हे एकमेव गाव आहे. ऑक्टोबर महिन्यापासून अंजिराचा खट्टा बहाराचा हंगाम घेण्यास सुरुवात झाली आहे. हा बहार चार महिने चालतो. मात्र, या हंगामाला सध्या पाण्याचे वेध लागले आहे. परिसरातील पाणीसाठा डिसेंबरअखेर संपुष्टात येण्याची चिन्हे असल्याने सिंचनातून आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खोरच्या परिसरात जवळपास 500 एकरावर पसरलेल्या अंजीर बागांना यावर्षी पावसाचा मोठा फटका बसला. शेवटच्या क्षणी परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने अंजीर फळबागेला दिलासा दिला आणि या भागात अंजीर उत्पादक शेतकरीवर्गात नवचैतन्य निर्माण झाले.

सध्या केवळ 10 टक्केच अंजीर बागेचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली असून, उर्वरित 90 टक्के बागा या डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. मात्र, अपुर्‍या पाणीसाठ्यामुळे डिसेंबर महिन्यापासून ते मे पर्यंतचा हंगाम पार पाडण्यासाठी शेतकरीवर्गापुढे पाण्याचा मोठा प्रसंग उभा राहणार आहे. पाणी संपुष्टात येण्याआधीच या भागाला योग्य नियोजन करून सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतकरीवर्गाची आहे.

आज दौंड तालुक्यातून पाणी उचलून बारामतीमधील जनाई-शिरसाई योजना चालवली जात आहे. मात्र, आमचे हक्काचे पाणी आम्हाला मिळत नाही ही मोठी खंत आहे. जनाई योजनेतून खोरच्या पद्मावती तलावात डिसेंबर अखेरपर्यंत पाणी सोडण्याची आमची मागणी आहे. तरच अंजिराचा पुढील हंगाम योग्यरीत्या पार पडेल.
                                                        – समीर डोंबे, अंजीर उत्पादक शेतकरी.

 

पाण्याची पातळी खालावत चालली असून, अजून पूर्ण क्षमतेने बागा सुरू झाल्या नाहीत. ज्यावेळी बागा पूर्ण क्षमतेने सुरू होतील, त्या वेळी पाण्याची मोठी कमतरता भासेल. पुरंदर जलसिंचन योजनेतून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात यावे, अशी आमची अपेक्षा आहे.
                                                            – जालिंदर डोंबे, अंजिर उत्पादक शेतकरी.

Back to top button