मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर महिला सरपंचांचे उपोषण | पुढारी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर महिला सरपंचांचे उपोषण

परिंचे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील परिंचे-हरणी रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी व उखडलेला रस्ता नव्याने तयार करावा, या मागणीसाठी सरपंच अर्चना राऊत व माजी सरपंच ऋतुजा जाधव यांनी आक्रमक होत पुणे येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर उपोषण करीत ठिय्या मांडला. या वेळी उपोषणाची तातडीने दखल घेत शाखा अभियंता यांनी संबंधित ठेकेदाराला नव्याने रस्ता करण्याचे आदेश दिले.

4 कोटी रुपये खर्च करून परिंचे-हरणी रस्ता करण्यात आला. मात्र, हे काम निकृष्ट झाले असून, जागोजागी रस्ता उखडला आहे. या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या कामाची चौकशी व्हावी व ज्या ठिकाणी रस्ता उखडला आहे, त्या ठिकाणी तो पुन्हा नव्याने तयार करून द्यावा, अशी मागणी परिंचे ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती. याबाबत अनेकदा विनंती अर्ज व उपोषण करण्यात आले होते. ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव यांनीही ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते. शेवटी ग्रामसभेचा ठराव घेत महिला सरपंच अर्चना राऊत व माजी सरपंच ऋतुजा जाधव या दोघींनी ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाच्या दारात उपोषण करीत ठिय्या मांडला.

आजी-माजी महिला सरपंचांनीच उपोषणाचे हत्यार उपसल्याने अधिकार्‍यांची चांगलीच धावपळ झाली व या उपोषणाची दखल घ्यावी लागली. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्या-त्या ठिकाणी नव्याने रस्ता करून देण्याचे लेखी पत्रच शाखा अभियंता शशिकांत कुलकर्णी यांनी परिंचे ग्रामस्थांच्या हाती दिले. तसेच, संबंधित ठेकेदाराला उखडलेला रस्ता नव्याने तयार करण्याचे आदेशही दिले.
या वेळी उपसरपंच गणेश पारखी, मयूर मुळीक, नीलेश जाधव, संजय जाधव, संजय दुधाळ, मिलिंद दुधाळ, सदस्य दत्ता राऊत, शशिकांत जाधव, मोहित जाधव, डॉ. राजेंद्र जाधव, मंदा शेडगे, संकेत जाधव, दत्ता भोसले, नवनाथ चौधरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button