कडूस : ऐन पावसाळ्यात महिलांच्या डोक्यावर हंडा; पावसाने दडी मारल्याचा गंभीर परिणाम

कडूस : ऐन पावसाळ्यात महिलांच्या डोक्यावर हंडा; पावसाने दडी मारल्याचा गंभीर परिणाम

कडूस(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने कडूस, धामणमाळ (ता. खेड) परिसरातील पाणवठे आटले असून विहिरीनी अक्षरशः तळ गाठला आहे. यामुळे आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात महिलांच्या डोक्यावर पाण्याचा हंडा आला आहे.

दिवसेंदिवस पाऊस लांबत चालला असून आतापर्यत ज्या विहिरींनी पाण्याचा आधार दिला होता, त्याच विहिरीनी तळ गाठला आहे. आबालवृद्ध महिलांसह नागरिकांना हातातील कामधंदा सोडून तळपत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतात काम करून मजूरी करावी की हंडाभर पाण्यासाठी दिवसभर वणवण करावी, असा प्रश्न महिलांसमोर निर्माण झाला आहे.

अर्धा ते एक किलोमीटर भटकंती करत विहिरीचा शोध घेऊन भल्या पहाटे पासून खासगी विहिरीवरून पाणी शेंदून डोक्यावर पाणी वाहवे लागत आहे. अनेकदा खोल विहीरीमध्ये उतरून पाणी काढावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कदूस परिसरातील वाड्या-वस्त्यावरील नागरिकांना यावर्षी प्रथमच ऐन जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे.

वाढत्या उन्हामुळे भूजल पातळी घटू लागली आहे. जलस्रोत काही प्रमाणात आटले असून रविवार (दि. २५) पासून धामणमाळ, पोशिदरा येथे टँकरने पाणी पुरवठा करणार आहोत. तरी पण धामणमाळ, पोशिदरा परिसरातील पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पाणी कसे जास्तीतजास्त उपलब्ध होईल, यावर ग्रामपंचायतीकडून नियोजन करण्यात येत आहे.

– शहनाज तुरुक शेख,
सरपंच, कडूस

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news