

पुणे : शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या. मुनाकिब नासीर अन्सारी (वय १८, रा. संजय पार्क, विमाननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा (पोक्सो), तसेच बलात्कार केल्याप्रकरणी अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलगी एका शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी अन्सारीने मुलीला शाळेत सोडण्याचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने गाडीवर शाळेत सोडतो, असे सांगून एका खोलीत नेले. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.