

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपद वर्षभरात संगीत खुर्ची म्हणून चर्चेत आले आहे.
एका वर्षात पाचव्यांदा अधीक्षक बदलण्यात आले आहेत. आता डॉ. किरणकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील महिन्यात सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील भामरे यांची अधीक्षकपदावर नेमणूक करण्यात आली होती. भामरे वैद्यकीय कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.
त्यामुळे प्रभारी कार्यभार डॉ. जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. बुधवारी (दि. 5) अधिष्ठाता कार्यालयाकडून डॉ. किरणकुमार जाधव यांच्या नियुक्तीचे पत्र काढण्यात आले. डॉ. जाधव हे शल्यचिकित्साशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक असून, प्रत्यारोपण समन्वयक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.
ससूनमध्ये 10 ऑगस्ट रोजी वरिष्ठ लिपिकाला वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. अटकेच्या कारवाईनंतर तासाभरातच अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी त्या वेळचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लापा जाधव यांची उचलबांगडी केली. डॉ. सुनील भामरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर महिनाभरातच पुन्हा नवीन नेमणूक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वर्षभरात ससूनमध्ये पाचव्यांदा अधीक्षक बदलण्यात आले आहेत. डॉ. भारती दासवानी, डॉ. विजय जाधव, डॉ. यल्लापा जाधव, डॉ. सुनील भामरे यांच्यानंतर आता डॉ. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ससूनमध्ये दर महिन्याला वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रमाणपत्र देण्यासाठी लाखो रुपयांची उलाढाल होते. अधीक्षकपदाकडे 'क्रिमी पोस्ट' म्हणून पाहिले जाते. त्यात एवढी बदलाबदल का केली जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा