G 20 Summit New Delhi : परदेशी पाहुण्यांना भूरळ घालणार पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल!

G 20 Summit New Delhi
G 20 Summit New Delhi
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, ६ सप्टेंबर; G 20 Summit New Delhi : जी-२० शिखर परिषदेसाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना भारतातील सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविण्याचे आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या राज्यांची विशेष ओळख बनलेली हस्तकला उत्पादने, वस्त्रप्रावरणे या पाहुण्यांमार्फत जगभरात पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य घटक असलेली पैठणी, कोल्हापुरी चप्पल जी-२० परिषदेचे स्थळ असलेल्या भारत मंडपममधील प्रदर्शन केंद्रामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. यासोबतच, गोव्यातील नाजूक विणकामाची (लेसवर्क) उत्पादने देखील परदेशी पाहुण्यांना यानिमित्ताने बघता येणार आहे.

G 20 Summit New Delhi : भारत मंडपम परिसरामध्ये या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री

 जी-२० परिषदेच्या निमित्ताने दिल्लीतल्या प्रगती मैदान भागातील भारत मंडपममध्ये पोहोचणाऱ्या परदेशी पाहुण्यांना आकर्षित करण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या भागांमधील एक जिल्हा एक उत्पादन या योजनेतील उत्पादने, जीआय टॅगिंग असलेली उत्पादने आणि महिला तसेच आदिवासी कलाकारांनी तयार केलेली उत्पादन मांडण्यात येणार आहे. ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत भारत मंडपम परिसरामध्ये या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे. यातून जागतिक मंचावर भारतीय उत्पादनांचा प्रचारप्रसार होईलच शिवाय स्थानिक कारागिरांना नवी बाजारपेठही उपलब्ध होईल. जी-२० सचिवालयाने वस्त्रोद्योग मंत्रालय, ३० राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेश यांच्या समन्वयाने हे प्रदर्शन भरविले आहे. यामध्ये खादी ग्रामोद्योग, ट्रायफेड, रसस, राष्ट्रीय बांबू मिशन या संस्थांचाही सहभाग आहे.

शिल्पबाजार या नावाने असलेल्या प्रदर्शन केंद्रामध्ये उत्तर भारत, पूर्व भारत, पश्चिम भारत, दक्षिण भारत तसेच ईशान्य भारतातील विशेष उत्पादनांचे स्टॉल असतील. त्यात महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल आणि महिलांचे विशेष आकर्षण असलेल्या पैठणी साडीचा स्टॉल असेल. कोल्हापुरी चपलेचे उत्पादन करणारे अमर बाजीराव सातपुते यांना ही या प्रदर्शनात महाराष्ट्राचे वैभव मांडण्याची संधी मिळाली आहे. तर रेशम आणि सोनेरी जरीकाम असलेली पैठणी सहावारी आणि नऊवारी या दोन्ही स्वरुपात या केंद्रावर उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त गोयंकरांच्या घरातील अविभाज्य घटक असलेल्या गोव्यामधील बारीक कलाकुसरीचे लोकरीचे विणकाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्पादनांचाही स्वतंत्र स्टॉल असेल.

G 20 Summit New Delhi : विविध राज्यांतील वैभव

यासोबतच पंजाबमधील फुलकरी उत्पादने, काश्मीरमधील कशिदाकारी असलेली वस्त्रप्रावरणे, पॅपीएर माशे या नक्षीदार कुप्या, हरियानातील पुंजा धुर्री चादरी, हिमाचल प्रदेशातील चंबा रुमाल, उत्तराखंडची विशेष लोकर, उत्तर प्रदेशातील चिकनकारी कपडे आणि बनारसी साड्या, बिहारमधील मधुबनी चित्रकला, झारखंडमधील आदिवासी परंपरेचे दागिने, ईशान्य भारतातील गवतापासून विणलेले मणिपुरी कौना उत्पादन, मेघालयमधील बांबूपासून तयार केलेली उत्पादने, नागालॅन्डमधील लोईन मागावर तयार केलेली वस्त्रप्रावरणे, ओडिशामधील पट्टचित्र पेंटींग, आसाममधील हॅन्डलूम उत्पादने, तामिळनाडूची खासियत असलेल्या कांचिपुरम सिल्क साड्या आणि तंजावूर पेंटिंग देखील याप्रदर्शनात असतील. त्याचप्रमाणे तेलंगाणामधील तेलिया रुमाल, आंध्रप्रदेशातील कलामकारी, कर्नाटकमधील कसुटी एम्ब्रॉयडरी उत्पादने, बिद्री उत्पादने, गुजरातमधील कच्छ आणि काठीयावाडमधील रंगीबेरंगी कपडे, पाटन पटोला साड्या, राजस्थानमधील पिच्छवाई पेंटिंग्ज, मध्यप्रदेशातील ऐतिहासिक चंदेरी विणकाम, छत्तीसगडमधील ढोकरा हस्तकला उत्पादने देखील परदेशी पाहुण्यांना भुरळ घालतील.

सूरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी

दरम्यान, जी-२० परिषदेसाठी दिल्ली शहर सज्ज झाले असून सुशोभीकरणाची तयारी देखील पूर्ण झाली आहे. पाहुण्यांच्या स्वागतात आणि सुरक्षेमध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात असून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने याकडे लक्ष ठेवून आहेत. सुरक्षेसाठी तैनात कर्मचारी व सहाय्यकांच्या सुलभतेसाठी ८ ते १० सप्टेंबर या कालावधीमध्ये दिल्ली मेट्रोने सर्व मार्गावरील मेट्रो सेवा पहाटे चारपासूनच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news