मुलुंड : मुलुंड पूर्व-पश्चिम, ठाण्यातील कोपरीत गॅस पुरवठा बंद
मुंबई : पुढारी वृत्तसेवा – मुलुंड पश्चिमेला आर. आर. टी. रोड, पाच रस्ताजवळ महानगर गॅसची पाईप लाईन फुटल्याने मुलुंड पूर्व-पश्चिम आणि ठाण्यातील कोपरी परिसरातील गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. सदर पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम एमजीएलतर्फे हाती घेण्यात आले. या परिसरातील कृष्ण वृंदावन इमारतीचे काम सुरु असताना सकाळी ८ वाजता तेथील पाईप लाईन फुटली असून लाईन दुरुस्तीचे काम दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ण होईल, अशी प्राथमिक माहिती महानगर गॅस कंपनीच्या प्रतिनिधीने दिली.
गॅस पुरवठा बंद झाल्याने मुलुंड पूर्व, मुलुंड पश्चिम आणि ठाण्यातील कोपरी परिसरातील महानगर गॅसचा पुरवठा सकाळच्या वेळेत अचानक बंद झाला. मुलुंड आणि ठाण्यातील कोपरी परिसरातील रहिवाशांचे हाल होत आहेत. अनेकांच्या घरात पाईप लाईनने गॅस पुरवठा होत असल्याने सकाळचा चहा-नाष्टा आणि दुपारच्या जेवणासाठी आता येथील नागरिकांना हॉटेलवर किंवा पदपथावरील खाद्यपदार्थ स्टॉलवर अवलंबून राहावे लागणार आहे.

