

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बाह्यरुग्ण विभागात वाढलेली गर्दी… एक्स-रे, सोनोग्राफी आज होणार नसल्याचे समजल्यावर हतबल झालेले रुग्ण… खूप वेळ वाट पाहूनही डॉक्टरांची न झालेली भेट, असे चित्र शुक्रवारी ससून रुग्णालयात पाहायला मिळाले. साडेपाचशे निवासी डॉक्टर संपावर गेल्याने ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडली. विद्यावेतनात वाढ व्हावी, दर महिन्याला दहा तारखेच्या आत वेतन मिळावे, वसतिगृहांमधील दुरुस्तीची कामे व्हावीत अशा मागण्यांसाठी राज्यभर मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आंदोलन पुकारले.
बीजे मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरही संपात सहभागी झाले. गुरुवारी संध्याकाळी 5 पासून संप सुरू करण्यात आला. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. ससून रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या पाहता, नेहमीच डॉक्टरांची कमतरता जाणवते. त्यातच निवासी डॉक्टर संपावर गेल्यामुळे तपासण्या, शस्त्रक्रिया, डिस्चार्ज प्रक्रिया यांवर परिणाम झाल्याने नाराजी पाहायला मिळाली.
संपात केवळ कनिष्ठ निवासी डॉक्टर सहभागी झाले असून, वरिष्ठ निवासी डॉक्टर कामावर आहेत. बाह्यरुग्ण विभाग, तसेच वॉर्डमध्ये 250 टीचिंग स्टाफ, 250 इंटर्न डॉक्टरांनी सेवा दिली. वसतिगृहाचे नूतनीकरणही करण्यात येत आहे.
– डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
हेही वाचा