नमो महारोजगार मेळाव्यात 20 हजार रिक्त पदांची नोंदणी | पुढारी

नमो महारोजगार मेळाव्यात 20 हजार रिक्त पदांची नोंदणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत 2 मार्च रोजी बारामती येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रांतील सुमारे 120 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी आत्तापर्यंत सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 20 हजारपेक्षा जास्त रिक्त पदे कळविण्यात आली, अशी माहिती कौशल्य विकास विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.

विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या पदांकरिता 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत. उद्योजक आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यांनी आपल्या उद्योग आस्थापनाची लिंकवर नोंदणी करून रिक्त पदे मेळाव्यासाठी अधिसूचित करावीत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी यांनीदेखील संकेतस्थळावर नोंदणी करावी.

या महारोजगार मेळाव्यात विविध विभागाच्या योजनांची, स्टार्टअप व विविध महामंडळे यांच्याद्वारे स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य देणार्‍या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच मेळाव्यात अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणार्‍या संस्थादेखील सहभागी होणार असल्याने कौशल्य प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांना याचा लाभ घेता येईल. उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पुणे विभागातील संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा, असेही पवार यांनी कळविले आहे.

हेही वाचा

Back to top button