पुणे : सर्वसामान्यांना उपचारासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे ससून रुग्णालय. पण येथे येणारे रुग्ण म्हणतात, 'ससून रुग्णालय चांगले आहे, पण ते आमच्यासाठी नाही. कुणीतरी येतो डॉक्टरांना फोनवर बोलणं करून देतो, त्यांना एकदम चांगली ट्रिटमेंट मिळते. पण आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं काय साहेब? आमच्यासाठी फोन करणारं कोणीच नाही. मग आम्हाला थांबावं लागतं वेटिंगवर,' हे शब्द आहेत ससूनमध्ये केसपेपर घेण्यासाठी थांबलेल्या हडपसरच्या रमेश वाघचौरे यांचे.
ससून रुग्णालयामध्ये दिवसभरात प्रत्येक विभागात रुग्णांचा राबता असतो. केसपेपर घेण्यासाठी सर्वच विभागांत तुम्हाला रांगेत थांबावेच लागते. अतिदक्षता विभाग (आयसीयू) देखील याला अपवाद नाही. कारण शनिवारी पहाटे तीन वाजता आलेल्या रुग्णाला सकाळी नऊ वाजता आयसीयूचा बेड उपलब्ध झाला. हा रुग्ण सातारा जिल्ह्यातील फलटण येथून पहाटे ससूनमध्ये दाखल झाला होता. रुग्णासोबत असलेले नातेवाईक म्हणाले, 'आम्ही पहाटे ससूनमध्ये आलो, आयसीयू बेड आवश्यक होता.
पण बेड उपलब्ध नसल्याचे सांगून तिथं असलेल्या डॉक्टरांनी खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. पैसे नसल्याचे सांगितले आणि ससूनमध्येच उपचार करण्याची विनंती केली. सकाळपर्यंत थांबल्यानंतर बेड रिकामा झाल्यास तुम्हाला देऊ म्हणून सांगितले. सकाळी नऊच्या सुमारास आमच्या रुग्णाला बेड मिळाला. सध्या आमचा रुग्ण उपचार घेत आहे.' त्यांचे नाव सांगितले तर त्या रुग्णाच्या उपचारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करून रुग्णासोबतच्या नातेवाइकांनी नाव सांगण्याचे टाळले.
सोलापूरमधील वेळापूरहून आलेल्या एका रुग्णाला पायातील रॉड काढायचा आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्याने पायाला दुखापत झाली. उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झालो, डॉक्टरांनी पायात रॉड टाकला आहे. आता तो काढण्यासाठी मागे एकदा ससूनमध्ये येऊन गेलो तेव्हा पंधरा दिवसांनी रॉड काढू, असे डॉक्टरांनी सांगितले. आता आल्यानंतर समजले की, त्या डॉक्टरांची भेट बुधवारीच आहे. गावी जाऊन पुन्हा पुण्यात येईन एवढे पैसे माझ्याकडे नाहीत. त्यामुळं मी इथंच ससूनच्या परिसरात राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे वॉकर सावरत एका कट्ट्यावर बसलेला रुग्ण सांगत होता.
ससून हे गरीब व गरजू रुग्णांसाठी वरदान असून, त्यामुळेच येथे रुग्ण येतात. मी माझ्या मुलीला प्रसुतीसाठी सकाळी सात वाजता दाखल केले असून, सोनोग्राफी काढली आहे. त्यानुसार डॉक्टर उपचार करत आहेत. ससूनमध्ये उपचार चांगले मिळतात म्हणूनच रुग्ण येतात.
– मन्सूर शेख, रुग्णाचे नातेवाईक.
आम्ही मूळचे लातूरचे, पण गेल्या काही दिवसांपासून पुण्यात राहतो. आई आजारी आहे, तिचं वय 95. खासगी रुग्णालयात जाण्याइतपत माझ्याकडं पैसे नाहीत. ससूनचं नाव पण बर्याच जणांनी सूचवल्यानंतर आईला ससूनमध्ये दाखल केलं. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, तिला आयसीयू बेड आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे; परंतु ते वेटिंगवर असून, ते कधी मिळणार? अशी विचारणा डॉक्टरांकडे केली, तर ते म्हणाले, 'बेड रिकामा झाला तरी, तो तुमच्या रुग्णाला मिळेलच असे नाही.' त्याचे कारण विचारले असता. 'ज्या रुग्णांचे वय कमी आहे, ज्या रुग्णाची वाचण्याची शक्यता अधिक असते, अशा रुग्णांना प्राधान्याने आयसीयू बेड उपलब्ध करून दिला जातो', असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आमच्यापुढे ही काहीच पर्याय नाही.
– वामन महापल्ले, रुणाचे नातेवाईक
ससून रुग्णालयात दररोज येणार्या रुग्णांची सरासरी संख्या एक हजाराच्या वर असते. तर येणार्या गंभीर रुग्णांची संख्याही मोठी असते. यातील बहुतांश रुग्णांना आयसीयू बेडची गरज भासते. ससूनमधील सर्व विभागात 110 आयसीयू बेड असून, उपलब्धतेनुसार त्यांना बेड उपलब्ध करून दिली जातात. अजून 15 बेड उपलब्ध होणार असून, लवकरच बेड उपलब्धता कळण्यासाठी डॅशबोर्ड तयार केले जाणार आहे.
– डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे.
हेही वाचा