

सुनील माळी
चला, चला सरूबाई, कोकणात चला...
चला, चला सरूबाई, कोकणात चला...
सरूबाई, सखुबाई, कोकणात चला...
आपला भाऊ चांगला, इलेक्शनचा त्यानं फॉरम भरला,
त्याच्या संगं जाऊ चला, अहो जाऊ चला,चला,
चला सरूबाई कोकणात चला...
इलेक्सन आली कॉर्पोरेसनची,
भावाकडनं भाऊबीज घ्यायची,
मार्गसीर्षातच दिवाळी करू चला,
चला, चला सरूबाई कोकणात चला...
इलेक्सनचा हंगाम आला अन् भावांचा खिसा सैल झाला,
भाऊ करी बुक आरामगाड्या, देई वरून फुकट साड्या,
चला गाडीत बिगीबिगी बसू चला,
चला चला सरूबाई कोकणात चला...
एक भाऊ नेई कोकणात, तर दुसरा कोल्हापुरात,
कुणाच्या बस पन्नास, तर कुणाच्या शंभर,
ताई नाव नोंदवा भरभर, ताई भरभर...,
नाव तुमचं न माझं नोंदवू चला,
चला, चला सरूबाई कोकणात चला...
कुणी करी पैठणीचा खेळ, छान जातो सगळ्यांचा वेळ,
चला आपण पैठणी जिंकू चला,
चला, चला सरूबाई कोकणात चला...
हेलिकॉपटर उडवी भाऊ, वरून आपली वस्ती पाहू,
भावाच्या हापिसला त्यासाठी जाऊ चला,
चला, चला सरूबाई कोकणात चला...
नव्या पेठेतला भावाचा प्रेशर कुकर,
नाव नोंदायला कार्डे वोटिंग अन आधार
नवेकोरे कुकर घेऊ चला,
चला, चला सरूबाई कोकणात चला...
कुणी उडवला सेलचा बार
निम्म्या किंमतीत टीव्ही, फीज गार
दोन लॅपटॉप, सायकली चार
सगळ्या वस्तू घेऊ चला,
चला, चला सरूबाई कोकणात चला...
कोकणाकडं बस निघाल्या,
महाकालकडं बस निघाल्या...
बाया-बापड्या सजल्या, सजून बसमध्ये बसल्या...
दोन दिसांची ट्रीप करू चला, करू चला,
चला, चला सरूबाई कोकणात चला...
सगळ्या जणी फिरून येऊ, आम्ही फिरून येऊ...
मतही भावालाच देऊ, हो भावालाच देऊ...
निवडूनही त्यालाच आणू, हो त्याला आणू...
...पण त्यासाठी चला आधी घाला चपला,
चला, चला सरूबाई, कोकणात चला...
उठा लवकर, आवरा भरभर,
सुटेल गाडी सहाच्या ठोक्याला, हो सहाच्या ठोक्याला...
चला, चला सरूबाई, कोकणात चला,
तुम्ही कोकणात चला...