

Pune Municipal Corporation Election: पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या पत्नीला पुणे महानगरपालिका निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने त्यांना प्रभाग क्रमांक १० मधून एबी फॉर्म दिला आहे.
विशेष म्हणजे पुण्यातील गुंडगिरी बोकाळली असताना अन् अजित पवार स्वतः पुण्यातील गुन्हेगारी मोडून काढा असं सतत म्हणत असताना त्यांच्याच पक्षाने एका कुख्यात गुंडाच्या पत्नीला एबी फॉर्म दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आज राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपली उमेदवारांची यादी जाहीर न करत शेवटच्या काही तासात एबी फॉर्मचं वाटप सुरू केलं आहे. पुण्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं यादी जाहीर न करता आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करणं सुरू केलं आहे.
त्यातूनच आता जयश्री मारणे या प्रभाग क्रमांक १० बावधनमधून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं समोर आलं आहे. जयश्री मारणे या गजाआड असलेल्या गजा मारणेच्या पत्नी आहेत.
पुण्यातील गुन्हेगारीबाबत माध्यमांमध्ये मोठमोठ्या बाता करणाऱ्या राजकारण्यांनी गुन्हेगारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उमेदवारी दिल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. गजा मारणेच्या पत्नीप्रमाणे गुंड आंदेकर देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गजा मारणे हा सध्या तुरूंगात आहे.
केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कॉम्प्युटर इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे अटकेत आहे. कोथरूड परिसरातील मारणे टोळीतील काही सराइतांनी देवेंद्र जोग नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात मारणेसह पाच जणांविरोधात गुन्हा झाला आहे. त्यांपैकी तीन जणांची रवानगी येरवडा कारागृहात झाली आहे. तर, रूपेश मारणे व बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार हे अद्याप फरार आहेत.