

Pune Municipal Elections 2026: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या राजकारणात मोठी घटना घडली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युती तुटल्याचं आता स्पष्ट झालं आहे. सध्या तरी पुण्यात युती होणार नसल्याची माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली.
युतीबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुंबईत काल रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या. घोषणा होणार, अशी चर्चा रंगली होती. त्यासाठी मध्यरात्री 12 वाजता पत्रकार परिषदही ठरवण्यात आली होती. मात्र ऐनवेळी ही पत्रकार परिषद रद्द झाली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम वाढला.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यातील शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत होती. त्याची अधिकृत घोषणा मध्यरात्री अपेक्षित होती. पण ठाण्यातून “थोडं थांबा” असा निरोप आल्यानंतर शेवटच्या क्षणी निर्णय बदलला गेला आणि पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.
आज मात्र चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे महापालिकेसाठी भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती सध्या तुटलेली आहे. मध्यरात्री रद्द झालेली पत्रकार परिषद, वरच्या पातळीवरून आलेला ‘थांबा’चा फोन आणि पुढील बैठकींची चर्चा.. या सगळ्या घडामोडींमुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. आगामी निवडणुकीत या बदलांचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.