

पुणे: व्यावसायिक विकासासाठी देशातील शालेय शिक्षकांना आता महाविद्यालये, विद्यापीठांतील प्राध्यापकांकडून अध्यापनाचे धडे दिले जाणार आहेत.
'नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग'अंतर्गत शालेय शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्राध्यापकांची निवड करण्यात येणार असून, किमान आठ वर्षांचा अनुभव असलेल्या प्राध्यापकांना यात सहभागी होता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) देशभरातील शालेय शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाच्या सक्षमीकरणासाठी 'नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग' ही योजना हाती घेण्यात आली आहे.
'राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०'नुसार ही योजना तयार केली आहे. 'एनएमएम : द ब्ल्यूबुक'च्या माध्यमातून या योजनेचा अंमलबजावणी आराखडा 'एनसीटीई'ने २०२४ मध्ये स्पष्ट केला आहे. तसेच, शिक्षकांच्या प्रशिक्षणात समूह आणि एकल संवादासाठी https://ncte.gov.in/nmm या संकेतस्थळाचीही निर्मिती केल्याची माहिती 'यूजीसी'ने दिली आहे.
या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थांनी त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या प्राध्यापकांपैकी 'नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग'अंतर्गत देशभरातील शालेय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून काम करू इच्छित असलेल्या, किमान आठ वर्षांचा अनुभव असलेल्या पात्र प्राध्यापकांची नावे acad@ncte-india.org या ई-मेलवर कळवावी. याबाबतची माहिती अधिकाधिक प्राध्यापकांपर्यंत पोहचवावी, असे 'यूजीसी'ने स्पष्ट केले आहे.