

पुणे: महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी व शाळा यांच्या प्रमुख मागण्यांसाठी 5 डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सक्रिय सहभागी होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
तांबारे म्हणाले, राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघ व राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनात नुकतीच ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिक्षक विद्यार्थी व शाळा यांच्या मागण्यांसाठी होणाऱ्या राज्यस्तरीय आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यामध्ये 2011 पूर्वी सेवेत दाखल शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून सूट देणे (टीईटी), जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांना 10, 20, 30 ची आश्वासित योजना लागू करणे, संचमान्यतेतील त्रुटी दूर करणे, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या थांबविलेल्या पदोन्नती त्वरित करणे, शिक्षकांना फक्त अध्यापनाचेच काम देणे, यासह विविध प्रश्नांसाठी एकदिवसीय लाक्षणिक संप व राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. या एकदिवसीय लाक्षणिक संपात व जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
गुणवत्तेच्या आधारावर सेवेत दाखल शिक्षकांना टीईटीतून सूट हवी
देशामध्ये प्राथमिक शिक्षण हक्क कायदा 1 एप्रिल 2010 मध्ये लागू झाला. त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रादेशिक निवड मंडळामार्फत परीक्षा घेऊन गुणवत्तेवर शिक्षकांची निवड केली जात असे.
1 एप्रिल 2010 नंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भोपाळ (एनसीटीसी) यांनी शिक्षकांची भरती करीत असताना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक केले. परंतु, एप्रिल 2010 पूर्वी जे शिक्षक सेवेत दाखल झालेले आहेत, ते स्पर्धा परीक्षा देऊनच गुणवत्तेच्या आधारावर सेवेत दाखल झालेले असल्यामुळे त्यांना सूट देणे गरजेचे असल्याचे देखील तांबारे यांनी स्पष्ट केले.