

Eknath Shinde Jai Gujarat slogan
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील (Amit Shah Pune visit) कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' अशी घोषणा दिली. यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी X वर पोस्ट करत, 'अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले!' असे म्हटले आहे.
पुण्यात या महाशयांनी अमित शहा यांच्यासमोर 'जय गुजरात' ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या, हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?' अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी या पोस्टसोबत शिंदेंच्या भाषणाचा व्हिडिओही शेअर केला आहे.
पुण्यातील कोंढवा कन्व्हेशन सेंटरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आधी 'जय हिंद, जय महाराष्ट्र', असे म्हटले. त्यानंतर शिंदे पुन्हा माईकजवळ आले आणि त्यांनी 'जय गुजरात', असा नरा दिला. यावरुन त्यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेने निशाणा साधला आहे.
दरम्यान, यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी एकदा चिकोडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावेळी शरद पवार, 'जय महाराष्ट्र, जय कर्नाटक' असे म्हटले होते. याचा अर्थ असा होत नाही की, शरद पवारांना कर्नाटकावर प्रेम आहे. महाराष्ट्रावर नाही. शिंदे यांच्या, 'जय गुजरात' म्हणण्यावरुन मोठा गोंधळ करण्याची गरज नाही. इतका संकुचित विचार मराठी माणासाला शोभत नाही. आम्ही प्रथम भारतीय आहोत. दुसऱ्या राज्याप्रति तिरस्कार केला जाऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
विरोधकांकडे मुद्देच राहिलेले नाहीत. ते असे मुद्दे घेत आहेत ज्याचा लोकांवरही परिणाम होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.