

पुणे: भारत देशाच्या उभारणीत श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे मोठे योगदान आहे.त्यामुळेच देशाच्या संरक्षणासाठी तिन्ही दलांच्या सेनानीना प्रशिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था वीर बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्यासाठी योग्य स्थान आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पुण्यात केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए )आवारात उभारण्यात आलेल्या बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे,केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज शेठ,,एनडीए चे प्रमुख व्हाईस अडमीरल गुरुचरण सिह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शहा पुढे म्हणाले की, युद्धाचे काही नियम कधीच कालबाह्य होत नाहीत. युद्धात देशभक्ती, समर्पण, बलिदान ही भावना असते. देशासाठी लढणासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रबोधिनीतील छत्रांना बाजीरावांच्या पुतळ्यापासून प्रेरणा मिळेल. बाजीराव यांनी २० वर्षात ४१ युद्ध जिंकली. अनेक हरलेली युद्ध त्यांनी विजयात परिवर्तित केली. बाजीराव पेशवे हे अजिंक्य योद्धे होते, त्याचबरोबर त्यांनी पाणीपुरवठा, सामाजिक सुधारणा या सारखी विकासाची कामे पण केली.
पुणे शहराबद्दल बोलताना ते म्हणाले की, पुणे हे स्वराज्य आणि स्वातंत्र्याचे उगमस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज बनवण्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराज,राणी ताराबाई, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी यांनी सांभाळली. स्वराज्याची ज्योत विझत आली असे वाटत असताना ती धुरा बाजीराव पेशव्यांनी पुढे नेली आता ही जबाबदारी आपल्यावर आहे. ऑपरेशन सिन्दुर हे त्याचेच एक उदाहरण आहे. २०४७ पर्यंत सर्व क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी इतिहासातून प्रेरणा मिळेल असही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,आपल्या देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला गेला परंतु इतिहासातील या योद्ध्यांची माहिती नव्या पिढी पर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.बाजीरावांनी पालखेडच्या लढाईत निजामाचा पराभव केला.त्या लढाईचा उल्लेख जागतिक पातळीवरील नोंद घेण्यात आली आहे.