Eknath Shinde: 'जय गुजरात...'; पुण्यातील कार्यक्रमात शिंदेंची शहांसमोर घोषणा
Eknath Shinde slogan Jai Gujarat
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या साक्षीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय महाराष्ट्र'ऐवजी 'जय गुजरात' अशी घोषणा दिल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पुण्यातील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात आज (दि.4) हा प्रसंग घडला, ज्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
PM मोदी, गृहमंत्री अमित शहा वेगळे नाहीत तर...; उपमुख्यमंत्री शिंदे
पुण्यातील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "१३ वर्षापूर्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या गुजराती भवनाचे भूमीपूजन झाले आणि आज (दि.4) लोहपुरूष गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण होतंय. मोदी ज्या ज्या कार्यक्रमांचे भूमीपूजन करतात ते काम वेगाने पुर्ण होते. गृहमंत्री अमित शहा आणि पीएम मोदी हे दोघे वेगळे नाहीत तर पीएम मोदींचेच प्रतिबिंब अमित शहा असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
प्रत्येक गुजराती 'लक्ष्मीपुत्र'; शिंदेंकडून उल्लेख
राज्यातील अनेक शहरांमध्ये गुजराती हे व्यावसायिक, उद्योजक आहेत. गुजरातींशिवाय कोणत्याही शहराची शोभा वाढूच शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गुजराती हा 'लक्ष्मीपुत्र' असल्याचा उल्लेख देखील उपमुख्यमंत्री शिंदेंकडून यावेळी करण्यात आला.
नेमकं काय घडलं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील एका भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन आज पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. आपल्या भाषणाच्या ओघात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना अचानक 'जय गुजरात' अशी घोषणा दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
घोषणेमागे राजकीय संकेत की सदिच्छा?
उपमुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजरातचे असल्याने त्यांच्या सन्मानार्थ किंवा महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील सलोख्याचे संबंध दर्शवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा दिली असावी का?, असा एक मतप्रवाह आहे.
राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या भूमीवर 'जय गुजरात'चा नारा देणे अनेकांना अनपेक्षित आणि खटकणारे ठरले आहे. या घोषणेवरून विरोधी पक्षांकडून टीका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विरोधकांच्या शिंदे-फडणवीस सरकार हे दिल्लीच्या इशाऱ्यावर चालत असल्याच्या आरोपांना या घोषणेमुळे आणखी बळ मिळू शकते, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कार्यक्रमापेक्षा घोषणेचीच चर्चा अधिक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका घोषणेमुळे उद्घाटन सोहळ्यापेक्षा त्यांच्या वक्तव्याचीच चर्चा अधिक रंगली आहे. हा केवळ एक सहज उद्गार होता की, यामागे काही राजकीय संदेश दडला होता, यावर आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आगामी काळात या घोषणेचे राजकीय पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

