वाळूमाफिया-मंडलाधिकारी ‘व्हिडिओ क्लिप व्हायरल’; दौंड महसूलचे कनेक्शन झाले उघड

वाळूमाफिया-मंडलाधिकारी ‘व्हिडिओ क्लिप व्हायरल’; दौंड महसूलचे कनेक्शन झाले उघड

यवत : पुढारी वृत्तसेवा

दौंड तालुक्यातील पश्चिम भागात कर्तव्यावर असणारे एक मंडलाधिकारी आणि वाळू ट्रकचा चालक यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने अजूनही दौंड तालुक्यातून अवैध वाळूउपसा आणि वाहतूक सुरू असून, त्याला महसूल विभागातील अधिकारीवर्गाचा वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम भागातील मंडलाधिकार्‍याची क्लिप ज्याप्रमाणे फिरत आहे.

तशाच स्वरूपाचा एक मंडलाधिकारी पूर्व भागातदेखील असून 'मीच नदीचा मालक आहे' अशा आविर्भावात तो फिरत असतो. परंतु, काही दिवसांपूर्वीच प्रहार संघटनेच्या पदाधिकारीवर्गाने त्याची 'सोशल मीडिया'वर 'पोलखोल' केल्यामुळे तो आता चांगलाच वठणीवर आला आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमधील मंडलाधिकार्‍यावर जिल्हा महसूल प्रशासन नेमकी काय कारवाई करणार, याची उत्सुकता दौंड तालुक्यात आहे.

तहसीलदार, प्रांताधिकारी हे वाळूउपसावर कारवाई करीत असताना तालुक्यातील काही मंडलाधिकारीवर्गाने आपली दुकानदारी जोरात सुरू ठेवली आहे. आम्ही वरिष्ठांना 'काडीची किंमत देत नाही, अजिबात जुमानत नाही' असा संदेशच ही मंडळी बहुतेक प्रशासनाला देत आहेत. तालुक्यातील वाळूउपसा करण्यावरून अनेकदा रक्तरंजित रणकंदन झाले आहे. वाळूउपसा करण्यापायी अनेक 'गँगवार' दौंड तालुक्याने पाहिले आहेत, यातून अनेक कुटुंबे उद्ध्वस्तदेखील झाली आहेत.

तालुक्याला लाभलेला नदीपट्टा हा जमीन सुपीक करण्यासाठी नसून वाळूउपसा करण्यासाठीच आहे, असा समज वाळूमाफियांनी करून घेतला आहे आणि याला साथ महसूलमधील मंडळी देत आहेत. सुरुवातीच्या काळात शासकीय नियमात होणारा वाळू लिलाव व त्यातून नियम धाब्यावर बसवून होणारा वाळू उपसा हरित लवादाच्या निर्णयामुळे थांबला असला, तरी चोरटा वाळू उपसा आणि वाहतूक महसूल आणि पोलिस यांच्या पाकीट संस्कृतीमुळे सुरूच आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमधील संबंधित मंडलाधिकार्‍याने आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news