कोल्हापूर : संकल्पना समजून घ्या; यश नक्कीच मिळेल : प्रा. पाटील | पुढारी

कोल्हापूर : संकल्पना समजून घ्या; यश नक्कीच मिळेल : प्रा. पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी पाठांतर न करता संकल्पना समजून घ्याव्यात. यश नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन स्पेक्ट्रम अकॅडमी नाशिकचे संचालक प्रा. सुनील पाटील यांनी केले.

प्रा. पाटील म्हणाले, पहिली ते दहावीतील परीक्षा, नंतर महाविद्यालयीन परीक्षा असे परीक्षांचे टप्पे असतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. तेव्हा त्याकडे करिअर म्हणून पाहण्याची गरज आहे. यूपीएससी बरोबरच एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे या क्षेत्रातही भरती होताना ती स्पर्धा परीक्षांमार्फतच केली जाते.

शालेय जीवनात असणारे अनेक विषयच पुढे स्पर्धा परीक्षेसाठी असतात. इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, अर्थशास्त्र, भाषा या विषयांचा सखोल अभ्यास करावा. या परीक्षा देताना आपल्या शेजारी बसणार्‍या विद्यार्थ्यांशी आपली स्पर्धा नसते तर ती वेळेशी असते. कारण दिलेल्या वेळेत प्रश्नांची अचूक उत्तरे देणे हे एक आव्हान असते. बुद्धीमापन चाचणी, सामान्य ज्ञान यासाठी वर्तमानपत्रांचे वाचन करून त्याच्या नोंदी ठेवाव्यात, असा सल्ला पाटील यांनी दिला.

गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रिकांचा सराव करावा. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात. यातून पहिल्या चाळणी परीक्षेतच अनेक विद्यार्थ्यांची गळती होते. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेसाठी यातून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास येते. करिअर घडवण्यासाठी या क्षेत्राकडे गांभीर्याने पहावे असे पाटील यांनी सांगितले.

Back to top button