पुणे; पुढारी वृत्तसेवा : भेसळयुक्त तूप बनवून त्याची बाजारामध्ये विक्री करणार्या रॅकेटचा चतुःशृंगी पोलिसांनी पर्दाफाश केला. पाषाणमधील एकनाथनगर भागात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी येथून एकाला ताब्यात घेत सातशे किलो भेसळयुक्त बनावट तुपासह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सांगसिंग तेजसिंग राजपूत (वय 38, रा. बुधवार पेठ; मूळ रा. राजस्थान) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपीने पाषाण भागात एका पत्राशेडमध्ये छोटा कारखानाच उभा केला होता. या ठिकाणी विविध मशिनच्या साहाय्याने आरोपी बनावट तूप तयार करून त्याची बाजारात विक्री करीत होता.
चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान पाषाण भागात एक जण पत्राशेडमध्ये तूप बनवत असल्याची माहिती अंमलदार बाबा दांगडे, इरफान मोफीन यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला असता हा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त तूप बनविले जाते. राजपूत हा आपल्या इतर सहकार्यांच्या मदतीने हे रॅकेट चालवत होता. चतुःशृंगी पोलिसांच्या सतर्कतेमुळे रॅकेटचा पर्दाफाश झाला. याबाबत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिली आहे.
एफडीए प्रशासनाने फिर्याद दिल्यास पोलिसांकडून तत्काळ गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे निरीक्षक अंकुश चिंतामण, जगन्नाथ जाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक रूपेश चाळके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हेही वाचा