

पुणे : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला पुणे पोलिसांनी परवाना नाकारला होता, मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, पुणे पोलिसांनी सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता, तरीही राज्याच्या गृहखात्याकडून 20 जून 2025 रोजी त्याला परवाना देण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे समोर आले आहे. मात्र पुणे पोलिसांकडे आलेल्या फाईलनुसार, अद्याप त्याला परवाना देण्यात आलेला नसल्याचे वास्तव समोर आले. (Latest Pune News)
पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळावा यासाठी सचिन घायवळ याने अर्ज केला होता. परंतु, त्याच्यावर गंभीर गुन्हे असल्याने पुणे पोलिस आयुक्तांनी 20 जानेवारी 2025 रोजी अर्ज फेटाळला. त्यानंतर घायवळने गृहखात्याकडे अपील दाखल केले तेव्हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे पोलिसांचा निर्णय रद्द करून ‘अपील मंजूर करण्यात येत आहे’ असा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांना परवाना देण्यास सांगण्यात आले.
सचिन घायवळने त्याच्या अर्जात म्हटले होते की, ‘मी व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगतो. त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे,’ म्हणून शस्त्र परवाना आवश्यक आहे. गृहविभागाने हे कारण ग्राह्य धरून परवाना मंजूर केला, असे आदेशात दिसून येते. मात्र त्या पिस्तुलाच्या परवाना फाईलवर मंजुरीची सही न होता ती फाईल पोलिस दफ्तरी पडून असल्याचीच माहिती या निमित्ताने समोर आली आहे.
कुख्यात नीलेश घायवळ आणि पिस्तुल परवान्यावरून चर्चेत असलेला त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्यासह इतर सात जणांवर कोथरूड येथील दहा सदनिका बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश घायवळवर मागील पंधरा दिवसांमधील दाखल झालेला हा पाचवा गुन्हा आहे. याबाबत एका व्यावसायिकाने तक्रार दाखल केली आहे. हा सर्व प्रकार 2019 ते 2025 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कोथरूड भागातील एका इमारतीचे काम तक्रारदार करत होते. तेव्हा आरोपींनी त्यांना तेथे जाऊन धमकावले. निलेश घायवळच्या परवानगीशिवाय येथे काहीही होऊ शकत नाही. त्यांचे बांधकाम अडवून त्यातील एका फ्लॅटची मागणी केली. तक्रारदारांनी तेव्हा तक्रार दिली नाही; पण बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर आरोपींनी याच इमारतीमधील दहा फ्लॅटचा जबरदस्तीने व खंडणी स्वरूपात ताबा घेतला. ते फ्लॅट भाड्याने इतर व्यक्तींना दिले. बापू कदम नावाच्या व्यक्तीने या फ्लॅटचे भाडे घेऊन ते निलेश घायवळला देत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. त्यानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर नीलेश घायवळविरोधात तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ही तक्रार पुणे पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे. निलेश घायवळ परदेशात आहे. त्याचे शेवटचे लोकेशन लंडनमध्ये आले असल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिसांनी त्याच्या पुणे व जामखेड येथील घरांवर छापेमारी केली. त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे. परंतु, कुटुंबीय फरार असल्याचे समोर आले आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.