

Rupali Thombare Patil Vidyanand Bapat Ganeshotsav: सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याच्या घटनेनंतर पुण्यात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बापट यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाची १३० वर्षांची परंपरा आणि पुणेकरांच्या भावनेचा दाखला देत त्यांनी, “पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार,” अशी भूमिका मांडली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये विद्यानंद बापट यांच्या पुण्यातील वास्तव्यासंदर्भात भाष्य करत त्यांच्यावर निशाणा साधला. “रत्नागिरीहून सात वर्षांपूर्वी पुण्यात नोकरीला आलेल्या माणसाने पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करावा हे शिकवू नये,” असे त्यांनी म्हटले आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असल्याचे ठोंबरे पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता आणि श्रीमंत थोरले बाजीराव रस्ता या परिसरांमध्ये गणेशोत्सवाची परंपरा पिढ्यान्पिढ्या जपली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. घराघरांतून आणि दुकानांमधून वर्गणी गोळा करून गणेशोत्सव साजरा करण्याची १३० वर्षांची परंपरा असल्याचा दावाही त्यांनी केला.
“गणपती कार्यकर्त्यांचे बालपण ढोलाच्या थापेवर गेले आहे. गणपतीच्या वर्गणीसाठी कार्यकर्ते उन्हात फिरले आहेत. ही १३० वर्षांची परंपरा आहे. फक्त डीजेचा विषय नाही,” असे ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले.
पुण्यात राहायचे असेल तर पुण्याची संस्कृती समजून घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले. “पुण्याच्या संस्कृतीला विरोध करून प्रसिद्धी मिळवता येणार नाही. नाहक प्रसिद्धीच्या नादात पुण्याचे नाव खराब होऊ नये आणि आमच्या गणपती उत्सवाला गालबोट लागू नये,” असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
दरम्यान, “आमचा गणेशोत्सव, आमचा अभिमान. पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार. पुण्याचा गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्योत्सव आहे. तो जोशात आणि आनंदात संपन्न होणारच,” अशी ठाम भूमिका रुपाली ठोंबरे पाटील यांनी मांडली आहे.
विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डीजे, लाऊडस्पीकर, गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण आणि पुण्याच्या पारंपरिक गणेशोत्सवाच्या स्वरूपावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.