पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी करावयाची 90 टक्के कामे झाल्याचा दावा केला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे प्रशासनाची पोलखोल केली असून शहरातील लहान, मोठे रस्ते आणि मोकळ्या जागा जलमय होत आहेत. दरम्यान, रस्त्यावर साचणार्या पाण्यावर उपाय म्हणून रस्त्यांवरील चेंबरची सिमेंटची झाकणे काढून लोखंडी जाळ्या बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
महापालिका प्रशासनाने शहर आणि उपनगरातील नाले सफाई, कल्व्हर्ट आणि पावसाळी गटारांच्या सफाईच्या कामांची मुदत 15 मे पर्यंत निश्चित केली होती. आतापर्यंत 90 टक्के पावसाळी कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, शहरात मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला असून मागील आठवड्यापासून सातत्याने कोसळणार्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने ही परिस्थिती होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे.
तसेच मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे देखील कमी वेळात अधिक पाऊस अर्थात ढगफुटीसदृश पाऊस होत आहे. अशातच शहरातील पावसाळी गटारांची वहनक्षमता कमी असल्याने ढगफुटीसदृश पावसात काही रस्त्यांवर अर्धाफुटांहून अधिक पाणी असते. यातून वाहन चालवताना कसरत करावी लागते, यामुळे कोंडीत भर पडते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले म्हणाले, शहर आणि उपनगरात साधारण चारशे कि.मी.चे छोटे मोठे नाले आहेत. जवळपास सर्वच नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.
प्रामुख्याने मोठे ओढे आणि नाल्यांच्या सफाईला प्राधान्य देण्यात आले असून आतापर्यंत 90 टक्क्यांहून अधिक स्वच्छता झाली आहे. तसेच सुमारे 175 कल्व्हर्ट असून त्यांचीही स्वच्छता करण्यात आली आहे. पावसाळी गटारे आणि चेंबर्सची स्वच्छता चेंबर्सवरील जाळ्या सातत्याने स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या रस्त्यांवर अधिक पाणी साठते अशा रस्त्यांवरील चेंबर्सच्या सिमेंटच्या जाळ्या काढून त्याठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा