समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा लवकरच भरणार : शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा लवकरच भरणार : शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक भरतीमधील समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून लवकरात लवकर भरल्या जातील. परंतु, अभियोग्यताधारकांची दिशाभूल करणे आणि चुकीची माहिती पसरविणे व आक्षेपार्ह पद्धतीने शिक्षण विभागास पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे. त्याला अभियोग्यताधारकांनी बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले आहे.

मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमधून निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळविण्यात आली होती व त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्ववत सुरू करण्यात आलेली होती. दरम्यान, विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 24 मे रोजी निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, असे आयोगाच्या प्रेस नोटमध्येच स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे.

समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याच्या प्रस्तावाला शासन मान्यता झाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आदर्श आचारसंहितेमधून यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागेसंदर्भातील कार्यवाही करण्यास निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे. मागील वेळेप्रमाणे या वेळी देखील शिथिलता मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. काही मंडळी अभियोग्यताधारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करीत आहेत, हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात असताना अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची दिशाभूल करणे. चुकीची माहिती पसरविणे व आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे, ही गंभीर बाब आहे. ज्या वेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या वेळी बुलेटीनद्वारे माहिती दिली जाईल, असे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news