

पुणे: मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे. तपासाच्या अनुषंगाने त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार असून शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यासह अन्य आरोपींशी त्यांची ओळख, संपर्क आणि जमीन व्यवहाराबाबत त्यांचा माहितीवजा जबाब घेतला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंढवा येथील ४० एकर जमीन अमेडिया एंटरप्रायझेसला विकण्याच्या व्यवहारातून हा घोटाळा समोर आला. तपासानुसार, शीतल किशनचंद तेजवानी यांच्याकडे २७२ जमीनधारकांच्या वतीने मुखत्यारपत्र होते.
त्याच आधारे त्यांनी संबंधित जमिनीच्या विक्रीचा व्यवहार केला. दिग्विजय अमरसिंह पाटील हे अमेडिया एंटरप्रायझेसचे भागीदार आहेत. पार्थ पवार यांचाही या कंपनीशी संबंध असल्याने पोलिसांकडून या व्यवहाराशी संबंधित व्यक्तींमधील संपर्काची माहिती घेतली जाणार आहे.
२१ कोटींच्या मुद्रांक शुल्काचा मुद्दा
या व्यवहारात सुमारे २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क न भरल्याचा आरोप आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित आदेश आणि दस्तनोंदणीतील अनियमिततेमुळे हे प्रकरण चर्चेत आले होते. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर जमीन प्रकरणात चुकीचे आदेश दिल्याचा, तर निलंबित दुय्यम निबंधक रवींद्र बालकृष्ण तारू यांच्यावर दस्तनोंदणी आणि मुद्रांक शुल्कासंदर्भात अनियमितता केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. संबंधित व्यवहारातील प्रत्येकाची भूमिका निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे.