

अशोक मोराळे
पुणे: सिया-चेतन अग्रवाल प्रकरण असो, आजोबाने नातवाचा गोळी झाडून केलेला खून असो किंवा अन्य कितीही क्लिष्ट गुन्हे असोत, त्यांचा छडा लावणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांना राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मात्र नेमके काय झाले आहे? हल्ला कोणी केला, का केला आणि त्यामागे नेमके कोणाचे डोके आहे, या प्रश्नांची उत्तरे पंधरा दिवसांनंतरही मिळालेली नाहीत की ती मुद्दामहून लपवली जात आहेत, असा प्रश्न पडू लागला आहे.
चौघांना अटक, एका अल्पवयीन ताब्यात आणि तीन निकटवर्तीय फरार... एवढी कारवाई करूनही तपासाची गाडी पुढे सरकताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘राणाजी, माफ करना... गलती म्हारेसे हो गई!’ अशी म्हणण्याची वेळ आता पोलिसांवर आली आहे की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात रविवारी (दि. १८) व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केला.
सुरुवातीला गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात धारदार शस्त्राने वार झाल्याचे तपासात पुढे आले. घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, तपास जसजसा पुढे गेला, तसतसे या संपूर्ण प्रकरणातील संशयाचे धुके अधिकच गडद होत गेले. या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे राणा यांचे तीन निकटवर्तीय हल्ला झाल्यानंतर राणा यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांच्या सोबत होते. मात्र, पोलिसांच्या तपासाची सुई त्यांच्याकडे वळताच तिघांनीही पळ काढला. पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फुटेज लागले असून, त्यातील हालचालींमुळे या तिघांवरील संशय अधिक बळावल्याचे सांगितले जाते.
पोलिसांनी त्यांना आरोपी केले असले, तरी अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. मग हे तिघे नेमके कुठे गायब झाले? त्यांना कोणाचा आश्रय आहे का? की या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी दडल्या आहेत? या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत. बारामती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी या तिघांना अटक झाल्यानंतरच खरी माहिती समोर येईल, असा दावा केला आहे. राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाने केवळ पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले नाहीत, तर राज्यातील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचेही वाभाडे काढले आहेत. राणा यांना देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा थेट पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या दरबारात पोहोचला. त्यानंतर झालेल्या बैठकीत राणा यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या पोलिस ताफ्याबाबत अनेक गंभीर बाबी समोर आल्या. राणा यांच्या सुरक्षेसाठी पुणे शहर पोलिसांव्यतिरिक्त अन्य तीन ते चार जिल्ह्यांतील पोलिस कर्मचारी होते.
एखाद्या मंत्र्याच्या सुरक्षा ताफ्यातही एवढा मोठा पोलिस फौजफाटा नसेल, तेवढी यंत्रणा एका व्यावसायिकाच्या सुरक्षेसाठी सज्ज होती. एकीकडे पोलिस ठाण्यांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा आहे. गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी अपुरे पडत आहेत. दुसरीकडे मात्र एका खासगी व्यावसायिकाच्या सुरक्षेसाठी विविध जिल्ह्यांतील पोलिसांची फौज तैनात केली जात असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. बैठकीत राणा यांना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा केंद्रस्थानी होता. संबंधित वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना दाते यांनी चांगलेच फैलावर घेतले. काही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता (कायदा व सुव्यवस्था) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांशी जवळीक असल्याच्या चर्चेमुळे राणा यांचा पोलिस अधिकाऱ्यांमध्येही प्रभाव निर्माण झाल्याचे सांगितले जाते. काही प्रकरणांत नियमांची चौकट ओलांडून त्यांना मदत करण्यात आल्याची माहितीही वरिष्ठ पोलिस वर्तुळातून समोर येत आहे. त्यामुळे हा केवळ हल्ल्याचा तपास राहिलेला नाही, तर पोलिस यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध आणि व्हीआयपी संस्कृती यांचीही कसोटी लागली आहे.