

पुणे: दिवाळी सणानिमित्त मिठाईला मागणी वाढत असताना कोंढवा बुद्रुक येथील गायत्री लाडू भांडारमधून १,१८८ किलो मोतीचूर लाडू आणि बुंदी, तर धानोरीतील आर. बिकानेर मिठाई केंद्रातून ३०३ किलो बर्फीचा साठा जप्त करून नष्ट केला आहे. दोन्ही कारवायांमध्ये एकूण १,४९१ किलो मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत दोन लाख ९४ हजार ९०० रुपये आहे. गायत्री लाडू भांडारचा अन्न उत्पादन परवानाही तत्काळ निलंबित केला आहे.
राज्यात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एफडीएकडून मिठाई उत्पादन आणि विक्री केंद्रांची तपासणी केली जात आहे. या मोहिमेत कोंढवा बुद्रुकमधील टिळेकर नगर येथील मे. गायत्री लाडू भांडारवर अन्न सुरक्षा अधिकारी के. व्ही. बारवकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. पुखराज नगादराम चौधरी यांच्या मालकीच्या या उत्पादन व साठा केंद्रातून १,००८ किलो मोतीचूर लाडू (एक लाख ५१ हजार २०० रुपये) आणि १८० किलो मोतीचूर बुंदी (२२ हजार ५०० रुपये) जप्त करण्यात आली.
हा साठा भेसळयुक्त अथवा चुकीचे लेबल लावलेला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका लक्षात घेऊन संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला. तसेच उत्पादनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. दुसरी कारवाई धानोरी (ता. खेड) येथील आळंदी-मार्कळ रस्त्यावरील माउली कॉम्प्लेक्समधील मे. आर. बिकानेर मिठाई केंद्रावर करण्यात आली. तपासणीदरम्यान ३०३ किलो बर्फीचा साठा आढळला. या बर्फीची अंदाजे किंमत एक लाख २१ हजार २०० रुपये आहे.
बर्फी संशयित निकृष्ट दर्जाची असल्याबरोबरच ती खोलीच्या तापमानात साठवून ठेवण्यात आली होती. तसेच मिठाईवर आवश्यक लेबल नव्हते आणि खरेदीची बिलेही उपलब्ध नव्हती. बर्फी नाशवंत असल्याने तिचा संपूर्ण साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. याच केंद्रातील कलाकंदाचा नमुना प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेण्यात आला आहे. धानोरी येथील कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी एच. आर. मारेवार यांनी केली. क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त एस. एन. चट्टे आणि सह आयुक्त (अन्न) एस. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
ग्राहकांनी सजग राहावे
सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करताना ग्राहकांनीही सजग राहण्याची गरज आहे. अन्नपदार्थांची योग्य तापमानात साठवणूक, आवश्यक लेबलिंग आणि खरेदीची बिले याबाबत अन्न व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.