

पुणे: शहरातील मोठा पाऊस कमी झाला असून, फक्त बुधवारच्या दिवशी हलक्या पावसाचा अंदाज आहे. गुरुवारपासून कोरडे वातावरण राहणार आहे. त्यामुळे दिवाळीतील पावसाचे सावट कमी झाले असून, थंडी जेमतेम म्हणजे किमान तापमानाचा पारा १७ ते १९ अंशांवर राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात आलेले मुरासू चक्रीवादळ मंगळवारीच क्षीण झाले. त्यामुळे गुरुवारपासून सर्वत्र कोरड्या वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गत दोन दिवस शहरात जोरदार पाऊस झाल्याने चांगलाच गारवा जाणवत आहे. तसेच, आर्द्रता ९८ ते १०० टक्यांवर गेल्याने पहाटे दाट धुके पडत आहे.
मात्र, गुरुवार पासून तापमानात वाढ होण्याचे संकेत आहे. त्यामुळे पावसाचे सावट कमी झाले आहे. तसेच, थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र, किमान तापमान १७ ते १९ अंशांवर स्थिर राहणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे १२ ते १३ नोव्हेंबरपासून किमान तापमानात किंचित घट होईल आणि पारा १३ ते १४ अंशांवर खाली येईल.
शहरात ५३ मि.मी. पावसाची नोंद..
शहरात ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी म्हणजे फक्त १.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहराचे वातावरण शुष्क अन् कोरडे झाले होते. मात्र, १ आणि २ नोव्हेंबर रोजी झालेल्या पावसाने कमाल-किमान तापमानात घट झाली. शहरात गारवा निर्माण झाला. गत ४८ तासांत शहरात ५३ मि.मी पावसाची नोंद झाली.