

वेल्हे: राजगड खोऱ्यातील निगडे बुद्रुक येथे शनिवारी (दि. १०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कडकडीत उन्हात अचानक १५ ते २० किलो वजनाचा भला मोठा बर्फाचा गोळा कोसळला. त्यावेळी शेतात काम करणारे महेश पवार व दत्तात्रय कुडले या शेतकऱ्याचे प्राण सुदैवाने वाचले.
या घटनेने हवामान शास्त्रज्ञ, कृषीतज्ज्ञ थक्क झाले आहेत. पावसाळी वातावरणात बर्फवृष्टी, ढगफुटी असे प्रकार घडतात; मात्र, पाऊस नसताना कडकडीत उन्हात आकाशातून जमिनीवर बर्फाचा गोळा पडण्याची ही पहिलीच दुर्मिळ घटना असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
महेश पवार व दत्तात्रय कुडले हे आपल्या शेतात काम करत होते. दुपारी दीड वाजता अचानक मोठ्या आवाजासह आकाशातून पांढरी वस्तू वेगाने खाली येऊन कोसळली. त्यावेळी दोघे शेतकरी अवघ्या ५० फूट अंतरावर होते. बर्फाचा गोळा टोमॅटोच्या शेतात पडला होता. जवळ जाऊन पाहिले असता सुमारे १५ ते २० किलो वजनाचा बर्फाचा मोठा गोळा असल्याचे दिसून आले. गोळा कोसळताना मोठा आवाज झाला, त्यामुळे जवळपासचा परिसर हादरला.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य आणि कुतूहल निर्माण झाले आहे. बदलत्या हवामानाचा याच्याशी काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असून, या घटनेची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी होत आहे.
बर्फ पडला तरी असा एका ठिकाणी पडत नाही. ढगफुटी झाली तर ती साधारणतः ३-४ किलोमीटर पर्यंत होते. अशी घटना प्रथमच घडली आहे.
डॉ. एस. बी. सानप, हवामानतज्ज्ञ
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. प्रशासन आणि हवामान विभागाने याची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
रोहिदास पिलाणे, शेतकरी
शेतात आकाशातून बर्फाचा मोठा गोळा पडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित ठिकाणाची पाहणी करून माहिती घेणे आवश्यक आहे. संबंधित वस्तू नेमकी काय आहे आणि ती कशामुळे पडली, याबाबत तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तपासणीशिवाय कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.
संजय ढमाळ, गटविकास अधिकारी, राजगड तालुका
ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. जागतिक पातळीवर बदलत्या हवामानाचे विविध परिणाम पुढे आले आहे. यात या घटनेची भर पडली आहे. याबाबत हवामान खात्यासह पर्यावरण विभागाला माहिती दिली आहे.
सुनील ईडोळे पाटील, तालुका कृषी अधिकारी, राजगड