

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या, एकेकाळच्या काँग्रेस नेत्या, माजी नगरसेविका, माजी महापौर, शरद पवार व अजित पवार यांच्या निकटवर्ती, ‘माझे जीवन, माझे व्हिजन’ या आत्मकथेच्या लेखिका, अशी राजलक्ष्मी भोसले यांची ओळख... लहानपणापासूनच समाजसेवेचे बाळकडू घेतलेल्या व राजकीय पार्श्वभूमी असतानाही उशिरा राजकारणात आलेल्या राजलक्ष्मीताईं नंतर मात्र आपल्या कर्तृत्वाने पुण्याच्या महापौर झाल्या. महापालिकेच्या तीन निवडणुका त्यांनी लढविल्या. उमेदवारी मिळविण्यापासून ते निवडून येईपर्यंतचा त्यांनी केलेला संघर्षमय प्रवास त्यांच्याच शब्दांत...
माझे आजोबा गणपतराव नलावडे तब्बल 42 वर्षे नगरपालिका व महापालिकेच्या राजकारणात होते. वडील हिराजी विधाते हे हडपसर भागातील प्रसिद्ध वकील, फर्डे वक्ते आणि कट्टर काँग्रेसवाले. दिवंगत नेते अण्णासाहेब मगर यांचे जवळचे सहकारी. त्यामुळे आमच्या घरी शेतकरी, कामगार, गोर गरीब, दीनदुबळ्या वर्गातील लोकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा राबता होता. आम्हा मुलांसाठी घरात अत्यंत शिस्तीचे वातावरण होते. वर्तमान पत्रे तर आम्हाला कम्पलसरी वाचावी लागत असत. भरपूर पुस्तकेही घरात उपलब्ध असत इतकेच नव्हे तर त्यावर वडिलांशी चर्चाही होत असे. आमच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा ते प्रयत्न करत असत. त्यामुळे वैचारिक जडणघडण होत गेली. माझा स्वभाव थोडासा निडर व धाडसी असल्याने इतर भावंडांपेक्षा वडील माझ्यावर थोडा अधिकच विश्वास दाखवत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ते मला बरोबर घेऊन जात. इतकेच नव्हे तर अगदी लहान वयातही लोकांची अनेक कामेही ते माझ्यावर सोपवत असत. सावकारीवर निर्बंध आले तेव्हा गोरगरिबांचे ऐवज सोडविण्यासाठी ते मला पोलिस ठाण्यात पाठवत होते. यातूनच गोरगरिबांच्या प्रश्नांविषयीची चांगली जाण निर्माण होत गेली. याच काळात राजकारणात महिलांसाठी आरक्षण आले होते. शालिनीताई पाटील, नजमा हेपतुल्ला, नंदिनी सत्पत्ती, प्रतिभाताई पाटील या पार्लमेंटमध्ये धडाडीने बोलणाऱ्या महिला नेत्यांचे माझ्या मनावर गारुड होते.
कष्टकरी महिलांना सक्षम करण्यासाठी हडपसर परिसरात मी काम करत होते. त्यांच्यासाठी मी बचत गटही सुरू केला होता. अशी कामे करत असतानाच वस्तीतील एका नळजोडासाठी शिफारसपत्र घेण्यासाठी मी एका नगरसेवकाकडे गेले होते. तर त्याने त्यावेळी ते दिलेच नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविण्याचे निर्णय घेण्यासाठी तरी आपण राजकारणात जायला हवे असे वाटू लागले. त्यातूनच 1992 मध्ये काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. मला उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसचे नेते बाळासाहेब शिवरकर यांनी भरपूर प्रयत्न केले. परंतु, काही तत्कालीन नेत्यांनी प्रस्थापितांनाच उमेदवारी देण्याचा आग्रह धरल्याने माझे नाव मागे पडले. उमेदवारी नाकारली गेल्यानंतरही चार वर्षे मी पक्षासाठी भरपूर काम केले. त्यामुळे 1997 च्या महापालिका निवडणुकीसाठी कलमाडींनी मला उमेदवारी द्यायचे ठरविले. परंतु माझे सहकारी व राजकीय गुरू अंकुश काकडे हेच माझ्या विरोधात होते. त्यांना त्यांचे मित्र दत्ता बनकर यांच्या घरातच उमेदवारी द्यावी, असे वाटत होते. परंतु या वेळी कलमाडी त्यांच्या मतावर ठाम राहिले आणि माझी उमेदवारी पक्की झाली. त्यामुळे दत्ता बनकर यांनी आपल्या पत्नी विमल बनकर यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले.
उमेदवारी मिळाल्यावर भागातील कार्यकर्ते व परिसरातील 50-60 मुले प्रचारासाठी माझ्याबरोबर फिरू लागली. या पोरासोरांना सोबत घेऊन मी काय निवडणूक लढविणार, असे तत्कालीन स्थानिक नेत्यांना वाटत होते. परंतु शेतमजूर आणि महिलांसाठी काम करताना मी घराघरात पोहोचले होते. माझे माहेर आणि सासरही त्याच परिसरातील असल्याने लोक मला माझ्या कामासाठी ओळखत होते. तसेच वडिलांची व आजोबांची पुण्याईही मदतीला होती. प्रचारासाठी आम्ही सकाळी नऊ वाजताच घराबाहेर पडत असू, ते एक दीड वाजताच घरी परत असू. त्यावेळी घरातील कुटुंबीयांनी शेतावरील महिलांच्या मदतीने सर्वांसाठी भाकरी, भाजीचे जेवण तयार ठेवलेले असायचे. दुपारी दीड, दोन वाजता शंभर दीडशे कार्यकर्त्यांसमवेत जेवण घेऊन सायंकाळी पुन्हा आमच्या प्रचाराला सुरुवात होत असे.
एकीकडे मी कार्यकर्त्यांसमवेत प्रचार करीत असताना घरातील भाऊ-बहिणी, दीर-भावजया, मुले व त्यांचे मित्र वेगवेगल्या टीम तयार करून स्वतंत्ररीत्या प्रचार करत असत. रात्री पुन्हा सर्वजण एकत्र जेवण करून घरी जात असू. त्यावेळी मोठ्या लोकांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेण्याची पद्धत होती. गांधी चौकात पारावर गावातील ज्येष्ठ मंडळी बसलेली असत. त्यावेळी त्यांना भेटायला गेले असता त्यातील एका ज्येष्ठ मतदाराला मी नमस्कार केला आणि निवडणुकीसाठी त्यांचे आशीर्वाद मागितले. त्यांना बहुधा अंधुक दिसत असावे. ते म्हणाले,’पोरी तुला मी आशीर्वाद देतो, पण मत मी वकील साहेबांच्या मुलीलाच देणार आहे.’ त्यांच्या या वाक्यानेच लोक मनापासून आपल्या पाठीशी असल्याची माझी खात्री झाली. अन् ही निवडणूक मी विक्रमी मताधिक्याने जिंकली. त्यावेळी पक्षातील नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यात शिवा मंत्री यांच्या पाठोपाठ माझा दुसरा क्रमांक होता. महिला नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणारी मीच पहिली नगरसेवक होते.
पहिल्याच टर्ममध्ये भरपूर काम केले असल्याने 2002 च्या दुसऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यात काही अडचण भासली नाही. 2002 ला प्रभाग पद्धती आली होती. यावेळी पॅनेलमध्ये माझ्यासोबत दत्तोबा ससाणे व दिलीप तुपे होते. काही बंडखोर व अपक्षही रिंगणात होते. परंतु मी सहज विजयी झाले. 2007 मधील निवडणुकीत चारचा प्रभाग झाला. आमचे सर्व पॅनेल या वेळी विजयी झाले. माझी पहिली निवडणूक अवघ्या दोन-अडीच लाख रुपये खर्चात झाली होती. प्रभाग पद्धती आल्यावर मात्र हा खर्च वाढतच गेला.
दरम्यान, 1997-98 मध्ये पक्ष फुटला. आमच्यासोबत अवघे नऊ नगरसेवक होते. अशाही परिस्थितीत महापौरपदासाठी मला उमेदवारी दिल्याने मी तयारी करीत होते. परंतु यावेळी ढोले पाटील यांनी त्यांच्या पत्नीला (कमलताई ढोले पाटील) संधी देण्याची विनंती केली. त्यांनी शरद पवार यांना त्यांनी तसे सांगितले. त्यानंतर पवार साहेबांनी मला फोन केला. लागलीच मी माघार घेण्याची तयारी दर्शविली. त्यावर, ’भविष्यात संधी येताच सर्वप्रथम तुमचाच विचार केला जाईल’, असे ते म्हणाले. पुढे 2007 मधील निवडणुकीनंतर ’पुणे पॅटर्न’ सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी मला महापौरपदी बसविले. त्यामुळे मी अडीच वर्षे महापौर म्हणून काम करू शकले. या काळात युवा राष्ट्रकुल स्पर्धांसाठी साडेतीन हजार कोटींचा निधी मी मिळवू शकले, तर रुंदीकरणासाठी लष्कराकडून अनेक जागाही मिळविता आल्या. महापौर म्हणून तब्बल तीन वेळा ’युनायटेड नेशन्स’च्या बैठकांना जाता आले, ही माझ्या दृष्टीने मोठी गौरवाची बाब आहे.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)