

किशोर बरकाले
पुणे : खासगी डेअर्यांकडून गायीच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटरला पुन्हा एक रुपयाने कपात करून तो 33 वरून 32 रुपये करण्यात आला आहे. जागतिक दूध दिना दिनीच, म्हणजे 1 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करीत अडचणीत असणार्या शेतकर्यांच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळण्यात आले आहे. महिनाभरात या खासगी डेअर्यांकडून लिटरला चार रुपयांनी दर कमी झाल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
दूध पावडर आणि बटरच्या दरातील घसरणीमुळे गायीच्या दूध खरेदीदरात कपात करण्यासाठी खासगी डेअर्या पुढे सरसावल्या आहेत.
गायीच्या दूधखरेदीचा दर लिटरला 36 वरून तीन रुपयांनी कमी करीत प्रथम 33 करण्यात आला. त्यावर दै. 'पुढारी'ने सातत्याने वाचा फोडल्याने पुन्हा दरकपातीसाठी होणारी बैठकच रद्द करण्यात आली होती. मात्र, सरकारचे नियंत्रण नसल्यामुळेच खासगी डेअर्यांकडून मनमानी पध्दतीने दूध खरेदीदर कमी केले जात असल्याने ओरड सुरू
झालेली आहे.
खासगी डेअर्यांनी दर कमी केल्यामुळे सहकारी दूध संघांनीही दर कमी करीत 33 रुपये केले. ते तूर्तास कायम असल्याचे सांगण्यात आले. मात्र, खासगी डेअर्यांनी दर कपात केल्याने अधिक दर असलेल्या सहकारी संघांकडील दूधसंकलन वाढते आणि त्यांनाही फटका बसतो, असेच चित्र पुन्हा उभे राहिले असून, काही मोजके खासगी डेअरीमालकच दरकपातीस पुढाकार घेत असल्याची ओरड दुग्धवर्तुळात सुरू झालेली आहे.
राज्य सरकारने दुग्ध उद्योगाच्या अडचणींवर निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठन गेल्याच आठवड्यात केली आहे.
मात्र, दूध खरेदी दराबाबत कोणाचाच धाक खासगी डेअर्यांना नसल्याने 'आम्ही करू तीच पूर्वदिशा' अशा अविर्भावात काही खासगी डेअरीमालक मनमानी करीत असल्याचा आरोप दुग्ध व्यवसाय करणार्या व्यापार्यांच्या वर्तुळातूनच व्यक्त केला जात आहे. त्यांना अटकाव घालण्यासाठी शासनाकडूनच कायदेशीर बंधनाची आवश्यकता बोलून दाखविली जात आहे.
दूध पावडरचे प्रतिकिलोचे दर वीस रुपयांनी कमी होत आज 260 रुपयांवर आले आहेत. तर, बटरचा किलोचा भाव तीस रुपयांनी कमी होत 350 रुपयांपर्यंत खाली आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वाढीव भावात दूध खरेदी करणे शक्य नसून खरेदी दर कमी करावे लागत असल्याची प्रतिक्रिया एका दूध पावडर उत्पादकाने व्यक्त केली. असे असले तरी दुधाचा विक्री दर प्रतिलिटरला पूर्वीइतकाच म्हणजे 50 ते 52 रुपयांवर स्थिरच ठेवण्यात आल्याने एकीकडे शेतकर्यांच्या खिशाला कात्री आणि ग्राहकांना जादा दराचा भुर्दंड असेच चित्र कायम असल्याने हाच चर्चेचा विषय झाला आहे.