नाशिक : केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा : मुख्यमंत्री | पुढारी

नाशिक : केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या, त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्याच्या यंत्रणांचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजे. मला आनंद व समाधान आहे की, प्रशासकीय यंत्रणेने या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचविल्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथून दूरद़ृश्यप्रणालीद्वारे विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थींशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. यावेळी कालिदास कलामंदिर येथे जिल्ह्यातील लाभार्थी, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी हजर होते. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी प्रास्ताविक केले. जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या औचित्याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माहिती दिली. याप्रसंगी मिशन महाग्राम या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. दरम्यान, महाआवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजूर होऊन ते पूर्णही झाल्याचा आनंद झाल्याची भावना सटवाईवाडी (ता. देवळा) येथील नामदेव मेधणे व्यक्त केली.

अन् लाभार्थी म्हणाले…

केंद्र सरकार व राज्य शासनाच्या आधाराने माझ्या कुटुंबाचा प्रवास कच्च्या घरापासून ते पक्क्या घरापर्यंत पूर्ण झाला आहे. आज मी केंद्र व राज्य शासनाच्या आठ योजनांचा लाभ घेतला आहे. माझे घर आज आनंदी असून, शासनाच्या योजना आमच्यापर्यंत पोहोचवणार्‍या यंत्रणेचे मनापासून आभारी आहे. – मीराबाई पवार, पिंपळदर, ता. बागलाण.

केंद्र व राज्य शासनाच्या एकूण आठ योजनांचा लाभ मी घेतला आहे. यामध्ये घरकुल योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर, त्यामध्ये वीजजोडणी, जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळजोडणी, उज्ज्वला योजनेतून गॅस, स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून शौचालय अशा आठ योजनांचा लाभ घेतल्याने माझे जीवनमान उंचावले. – आनंद पाटील, कावनई, ता. इगतपुरी.

हेही वाचा:

Back to top button