

सासवड: पुण्यातील आयटी कंपन्यांचे परराज्यांत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आणि पुणे जिल्ह्यात नव्या औद्योगिक संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने पुरंदर तालुक्यात सुमारे 572 हेक्टर (जवळपास दीड हजार एकर) क्षेत्रावर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव पुढे सरकला असून, याबाबतची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. आमदार विजय शिवतारे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर ते बोलत होते.
सध्या मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरंदर आयटी पार्कचा मुद्दा चर्चेला आला. या वेळी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी माहिती देताना सांगितले की, पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि अन्य अडचणींमुळे काही आयटी कंपन्या परराज्यांत स्थलांतरित होत असल्याची बाब चिंताजनक आहे. त्यामुळे पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी मांडलेली पुरंदर येथे आयटी पार्क उभारण्याची मागणी योग्य आणि दूरदृष्टीची आहे.
या प्रकल्पासाठी 3 एप्रिल 2025 रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर 15 ऑक्टोबर 2025 रोजी प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडून उद्योग विभागाला प्रस्ताव प्राप्त झाला. पुढे 27 फेबुवारी 2026 रोजी महसूल विभागाकडे सुमारे 572 हेक्टर जागा हस्तांतरणाची मागणी करण्यात आल्याची माहितीही नाईक यांनी दिली.
या विषयावर आमदार विजय शिवतारे यांनी विधानसभेत बोलताना जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या आयटी पार्कची अधिकृत घोषणा करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, या प्रकल्पाचा अंतिम प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार असून, पुरंदर आयटी पार्कची घोषणा आजच करण्यात येत आहे. महसूल विभागाच्या जमिनीवर उद्योग उभारणीसंदर्भात यापूर्वी केलेल्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील काळातही पाठपुरावा करणार : शिवतारे
या घोषणेनंतर आमदार विजय शिवतारे यांनी समाधान व्यक्त केले. पुरंदर तालुक्यात आयटी पार्क उभारणीवर आता शिक्कामोर्तब झाले असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकर मार्गी लागावा, यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करणार, असे त्यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेले हे आयटी पार्क प्रत्यक्षात आले, तर स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यासह परिसराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, असेही शिवतारे यांनी सांगितले.