

पुणे: विटांचा ट्रक खाली करण्यासाठी वाहने बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणातून एकाने तरुणाच्या अंगावर तीन जर्मन शेफर्ड कुत्री सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कुत्रीने तरुणाच्या पायाला चावा घेतल्याने मोठी जखम झाली आहे. तसेच, संबंधित व्यक्तीने या तरुणाला शिवीगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. रोहन राजेंद्र जांभुळकर (वय 39) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी, राजेंद्र एकनाथ जांभुळकर (वय 65, रा. कॅमेलिया अपार्टमेंट, वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कुत्रीचा मालक जॉन गेगरी फर्नांडिस (वय 57, रा. कपिल वुड्रो इस्टेट, आझादनगर, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आझादनगरमधील सार्वजनिक रोडवर 29 मार्च रोजी दुपारी 2 वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभूळकर यांची आझादनगरमध्ये तीन गुंठे वडिलोपार्जित जमीन आहे. या जागेत त्यांनी बांधकाम सुरू केले आहे. बांधकामासाठी विटांचा ट्रक आला. त्यांना विटा खाली करायच्या होत्या. जांभूळकर यांच्या जागेच्या गेटसमोर जॉन फर्नांडिस याने त्याच्या मालकीची चार चाकी व दुचाकी पार्क केली होती.
त्यामुळे विटांचा ट्रक आत नेता येत नव्हता. तेव्हा जांभूळकर यांनी गेटसमोर पार्क केलेली वाहने काढून घेण्याची विनंती केली. तेव्हा त्याने ही वाहने काढून घेण्यास नकार दिला. मुद्दाम भांडणे करण्यास सुरुवात केली. जांभूळकर व त्यांचा मुलगा रोहन यांनी फर्नांडिस याच्याशी वाद न घालता ही वाहने बाजूला सरकावण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा जॉन फर्नांडिस याने त्याची 3 पाळीव जर्मन शेफर्ड कुत्री त्यांच्या अंगावर सोडली.
त्यापैकी एका कुत्र्याने रोहन यांच्या डाव्या पायाच्या पोटरीचा जोराचा चावा घेतला. त्यांच्या पायाला मोठी जखम होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर जॉन फर्नांडिस याने हातातील वस्तूने दोघा बापलेकांच्या अंगावर धावून त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिस हवालदार क्षीरसागर तपास करीत आहेत.