पुण्यातील कचरा पुरंदरवासीयांच्या मुळावर

पुण्यातील कचरा पुरंदरवासीयांच्या मुळावर

दिवे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसाने ओढ दिल्याने पुरंदर तालुक्यात पाण्याच्या टंचाईचे सावट आहे. या स्थितीत केवळ पुरंदर उपसा सिंचन योजनेचा शेतकर्‍यांना आधार आहे. परंतु, एकीकडे नदीत मुबलक पाणी असताना केवळ पुणे शहरातून वाहून आलेला कचरा पुरंदर उपसा योजनेच्या बंधार्‍यास साठल्याने पाणी उपसा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे गेली सहा दिवसांपासून ही योजना बंद आहे.
पुरंदर तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. पाण्याअभावी अंजीर व सीताफळाच्या बागा सुकू लागल्या आहेत.

तसेच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागाची मदार आता पुरंदर उपसा जलसिंचन योजनेवरच आहे. सध्या धरण परिसरात पाऊस सुरू असल्याने मुळा-मुठा नदीला पाणीदेखील स्वच्छ पाणी आहे. त्यामुळे इथल्या शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आम्ही पैसे भरतो, परंतु आमचे बंधारे, ओढे, नाले स्वच्छ पाण्याने भरून द्या, अशी आर्त हाक इथल्या शेतकर्‍यांनी दिली होती. परंतु, पाण्यासाठी आ वासून बसलेल्या शेतकर्‍यांच्या तोंडाला केवळ कचर्‍यामुळे अक्षरशः पाने पुसली गेली.

सध्या नदी वाहती आहे. पाण्याबरोबर पुणे व आसपासचा कचरा, जलपर्णी वाहून आली आहे. ती व ज्या ठिकाणी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी उचलले जाते, त्या बंधार्‍यात येऊन साठली आहे. त्यामुळे पंपहाऊस सुरू होताच हा कचरा अडकून पंप बंद पडत आहे. गेली सहा दिवसांपासून भरपूर पाणी असूनदेखील योजना बंद आहे. कचरा, जलपर्णी काढण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. परंतु, पुण्याच्या बाजूने अजूनही कचरा येत असल्याने योजना सुरू होणे कठीण झाले आहे. पाणी सुरू होणार असे जरी सांगितले जात असले तरी जॅकवेलमधे कचरा अडकून योजना पुन्हा बंद पडू शकते, असे येथील कर्मचार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news