

पुणे: शहरात थंडीचा कडाका वाढला असून, रविवारी (दि. १५) एनडीए १०.२, तर शिवाजीनगर येथे १२.१ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान रविवारी राज्यात नीचांकी ठरले. शहरात २७ नोव्हेंबर १९६४ रोजी ४.६ अंश इतके नीचांकी तापमान नोंदले गेले होते.
शिवाजीनगर येथील तापमानात सरासरीपेक्षा ३.३ अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे पहाटे शहरात गारठा जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाश निरभ्र असल्याने रात्री उष्णतेचे विकिरण वेगाने होत आहे.
परिणामी, पहाटेच्या किमान तापमानात घट होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार पुण्यात नोव्हेंबर महिन्यातील सर्वकालीन नीचांकी तापमान २७ नोव्हेंबर १९६४ रोजी नोंदविण्यात आले होते. त्या वेळी पारा ४.६ अंशांपर्यंत घसरला होता. नोव्हेंबर २०१२ मध्येही तापमान ७.९ अंशांवर गेले होते, तर नोव्हेंबर २०२२ मध्ये ८.८ अंशांची नोंद झाली होती.
पुढील दोन दिवस शहरात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किमान तापमान १२ ते १३ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री थंडी जाणवणार असून, दुपारच्या वेळी मात्र तुलनेने उबदार वातावरण राहील.
बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम शहरावर जाणवण्यास अजून दोन ते तीन दिवस लागतील. त्या भागातून शहरात बाष्पयुक्त वारे वेगाने आले, तर थंडीत लगेच वाढ होण्याची शक्यता आहे.