

पुणे: पुणेकरांचे लक्ष लागलेल्या महापालिकेच्या प्रभाग क्र. २४ कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पीटल-केईएम हॉस्पीटलमधून भाजपचे गणेश बिडकर यांनी तब्बल ९ हजार २३४ मतांनी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचे चिरजींव प्रणव धंगेकर यांचा पराभव केला. बिडकर यांच्यासह भाजपचे चारही नगरसेवक या प्रभागात विजयी झाले.
शहरातील चुरशीच्या लढतीमध्ये बिडकर-धंगेकर यांच्या निवडणुकीचा समावेश होता. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत बिडकर यांनी १ हजार २४१ मतांनी आघाडी घेतली. दुसरी फेरीतही आघाडी कायम ठेवत त्यांनी थेट त्यांनी ४ हजार ०५७ मते मिळविली. तिसरी फेरीत ही आघाडी थेट ६ हजार ५९३ मतांवर गेली.
पुढे प्रत्येक फेरीत ही आघाडी वाढत गेली आणि नव्या फेरी अखेर बिडकरांनी धंगेकरांवर तब्बल ९ हजार २३४ मतांनी दणदणीत विजयी मिळवित २०१७ च्या महापालिका निवडणुकीतील पराभवाची परतफेड केली. बिडकर यांच्या समवेत प्रभाग क्र. २४ मधून भाजपच्या कल्पना बहिरट, उज्वला यादव आणि देवेंद्र वडके ही विजयी झाले.
प्रभाग क्र. २३ मध्ये प्रतिभा धंगेकर पराभूत
महापालिकेच्या प्रभाग क्र. २३ रविवार पेठ- नाना पेठ या प्रभागातून प्रतिभा धंगेकर पराभूत झाल्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर ३ हजार २२८ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे लक्ष्मी आंदेकर ह्या १४० मतांनी विजयी झाल्या. तर याच प्रभागातून भाजपचे विशाल धनवडे आणि पल्लवी जावळे ह्या विजयी झाल्या.
अविनाश बागवे अवघ्या ६२ मतांनी पराभूत
महापालिकेच्या प्रभाग क्र. २२ मधून क़ाँग्रेसचे अविनाश बागवे यांना अवघ्या ६२ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या विरोधात विवेक यादव विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शानूर शेख यांनी ८ हजार मते घेतल्याने बागवे यांना फटका बसला. त्यांच्या पत्नी इंदिरा बागवेही पराभूत झाल्या. या प्रभागात भाजपच्या अर्चना पाटील, मृणाल कांबळे तर काँग्रेसचे रफिख शेख विजयी झाले.