

Ajit Pawar On PMC Election Results
पुणे : "जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो," अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर महानगरपालिका निवडणुकीतील निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू, असं खात्रीनं स्पष्ट करतो, असेही त्यांनी नमूद केले आहे.
यश मिळवलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर जे विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनीही निराश न होता जनतेसाठी कार्यतत्पर राहावं, केंद्रस्थानी नेहमी जनतेचं भलं आणि जनतेसाठी अखंड कार्यरत राहणं हेच ध्येय ठेवावं, असं आवाहन करतो, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. (सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार १६५ जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाजप - ९०, काँग्रेस - ८, राष्ट्रवादी (अजित पवार) - २०, राष्ट्रवादी (शरद पवार) - ४ जागा जिंकल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पार्टी ८४ जागांपर्यंत पोहोचली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस ३७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. २०१७ मध्ये विचार केला तर ७७ अधिक ५ अपक्ष असे भारतीय जनता पार्टीकडे संख्याबळ होते, तर राष्ट्रवादीकडे ३६ जागा होत्या. यावेळेस राष्ट्रवादीची एक जागा वाढलेली आहे. नऊ जागा असणारी शिवसेना यावेळेस सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.