

पुणे: विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध झाली. या यादीतून तब्बल २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे २०२५ मध्ये सुमारे ९० लाख ८० हजार असलेली जिल्ह्याची मतदारसंख्या आता ६२ लाख १३ हजार ६९२ इतकी झाली आहे.
प्रारूप यादीतील मतदारांमध्ये ३० लाख ६२ हजार महिला आणि ३१ लाख ५१ हजार पुरुष मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, प्रारूप मतदार यादीवर नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबरपर्यंत त्यावर कार्यवाही करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी दि. ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.
२०२५ च्या मतदार यादीत चिंचवड आणि हडपसर हे मोठे मतदारसंघ होते. मात्र, प्रारूप यादीत भोसरी मतदारसंघ सर्वांत मोठा ठरला आहे. हडपसर मतदारसंघातील मतदारसंख्या सुमारे तीन लाखांनी घटली आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ सर्वांत लहान ठरला आहे. शिवाजीनगरमध्ये सर्वांत कमी ७९ हजार २४२ पुरूष मतदार आहेत.
त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ८७ हजार ४६७ आणि कसबा पेठेत ९३ हजार ५३४ मतदार आहेत. भोसरीत सर्वाधिक २ लाख ४३ हजार ३१५ पुरुष मतदार आहेत. महिला मतदारांमध्येही शिवाजीनगरमध्ये सर्वांत कमी ८४ हजार २, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ९२ हजार १२७ आणि कसबा पेठेत ९८ हजार ६६९ मतदार आहेत. भोसरीमध्ये सर्वाधिक २ लाख १८ हजार ५३६ महिला मतदार आहेत.
१७ लाख ८३ हजार मतदारांचा ठावठिकाणा नाही
२०२५ च्या मतदार यादीच्या तुलनेत प्रारूप यादीतून वगळण्यात आलेल्या २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांमध्ये १ लाख ४३ हजार ९७५ दुबार मतदार, ३ लाख १२ हजार ४८ मृत मतदार आणि ५ लाख ९१ हजार ३८ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उर्वरित १७ लाख ८३ हजार ५८ मतदारांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या मतदारांनी एसआयआरअंतर्गत आवश्यक अर्ज भरला नसल्याने त्यांची नावे प्रारूप यादीत दिसून आलेली नाहीत. संबंधित मतदारांना पुन्हा अर्ज क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अशा मतदारांनी तातडीने अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी पात्र मतदारांची संख्या अंतिम यादीत काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.