

अमृत भांडवलकर
सासवड: प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जमिनीला सोन्याचे दर आल्याने पुरंदर तालुक्यात बेकायदा प्लॉटिंगला उधाण आले आहे. शेतजमिनींचे गुंठ्यागुंठ्याने तुकडे करून विक्री सुरू आहेत. तसेच, काही भू-खंडांमधून जाणारे नैसर्गिक ओढे मुरूम, माती व दगड टाकून बुजवून त्यावर प्लॉटिंग केले जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. नैसर्गिक जलप्रवाहच गिळंकृत केला जात असताना संबंधित विभाग आणि प्रशासन गप्प का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
पुरंदरमध्ये विमानतळाची घोषणा झाल्यानंतर सासवड, जेजुरीसह वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, दिवे, झेंडेवाडी, काळेवाडी, सोनोरी, वाघापूर, बोपगाव, भिवरी, सुपे, हिवरे, चांबळी आदी परिसरात जमिनीच्या व्यवहारांना वेग आला. पुणे-मुंबईतील गुंतवणूकदारांसह स्थानिक पातळीवरही मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्री झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, रेखांकनानुसार भूखंड विकसित करताना अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती, जलनिस्सारण व्यवस्था, गटारे व आवश्यक संरक्षक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधितांची असताना अनेक ठिकाणी नियमांना बगल दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ओढे बुजवून पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखल्यास भविष्यात पूरस्थिती, शेतीचे नुकसान आणि पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
विमानतळाच्या भवितव्याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू असतानाच बेकायदा प्लॉटिंगचा वाढता विळखा गंभीर बनला आहे. ओढे बुजविणे, अनधिकृत रेखांकन आणि नियमबाह्य जमीन विक्रीवर महसूल, नगररचना व स्थानिक प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सामान्य ग्राहकांच्या पैशांवर संकट
गुंतवणुकीच्या आमिषाने अनेक ग्राहक प्लॉट खरेदीकडे वळत आहेत. मात्र, ७/१२ उतारा, मालकी हक्क, जमीन वापराचा झोन, टाउन प्लॅनिंगची मंजुरी, रेखांकन आणि संबंधित प्रकल्पाची कायदेशीर स्थिती तपासल्याशिवाय व्यवहार करू नयेत, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
राजकीय 'आशीर्वादा'ची कुजबुज?
बेकायदा प्लॉटिंगच्या व्यवहारांमध्ये काही राजकीय प्रभावशाली व्यक्तींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याच्या चर्चा परिसरात सुरू आहेत. त्यामुळे प्रशासन कारवाई करण्यास धजावत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.