

ओतूर: उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावरील अणे माळशेज पट्ट्यात शनिवारी रात्री ८ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही, त्यातच पिंपळगाव जोगा धरण प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पुष्पावती नदीत २ हजार क्युसेक वेगाने सोडलेल्या पाण्याने आजुबाजूच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
याबाबत पिंपळगाव जोगा येथील शेतकरी नवनाथ सुकाळे म्हणाले की, पिंपळगाव जोगा धरणातून आधीच पाण्याचा विसर्ग सुरू ठेवायला लागत होता याबाबत धरण प्रशासनाला आम्ही तोंडी विनंती केली होती . मात्र त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले. (Latest Pune News)
रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक पुष्पावती नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने एक गाई वाहून गेली. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे , विद्युत पंप,वायर, केबीन बॉक्स,शेतीची अवजारे असे सर्वकाही वाहुन गेले आहे.
शेतात उभी असलेली पिके वाहून जाऊन मोठे नुकसान झाले असून याची भरपाई कोण करणार? असा यक्ष प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.याबाबत अधिक माहिती घेतली असता पिंपळगाव जोगा धरण ९० टक्के पेक्षा जास्त भरलेले असल्याने अतीवृष्टीचा इशारा मिळाल्यावर धरण प्रशासनाने लगेच धरणातून नदी पात्रात पाणी सोडणे गरजेचे होते.
कुकडी पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे काही भागात नदी लगत असलेल्या शेकडो फुटांपेक्षा अधिक शेती क्षेत्रात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न येथील शेतकरी विचारीत आहेत.
पिंपळगाव जोगा येथील बळीराम लक्ष्मण हांडे यांची कांद्याने भरलेली आख्खी कांदाचाळ पाण्यात बुडाली आहे. कित्येक शेतकऱ्यांचे विद्युत पंप, पाईप व मोटारीचे केबीन बॉक्स, वायर व शेती अवजारे वाहुन गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अहील्यानगर ते कल्याण व पिंपळगाव जोगा गावठाण यांना जोडणाऱ्या मार्गावरील पुष्पावती नदीवरील पुल पाण्याखाली गेला असल्याने पिंपळगाव जोगा, भोईरवाडी, सागनोरे, कोल्हे वाडी, खिरेश्वर या गावांचा संपूर्ण संपर्क तुटला आहे. तसेच नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने उदापूर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलही पाण्याखाली बुडाला असल्याने या परिसरात वाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.
पिंपळगाव जोगा धरणातून पुष्षावती नदीत मोठ्या प्रमाणात अचानक पाणी सोडल्याने काही भागात नदी पात्रा पासून शंभर ते दीडशे फुट बाजूला पाणी शेतामध्ये व इतर भागात शिरले. पिंपळगाव जोगा येथे अवघी स्मशानभूमी पाण्यात बुडाली असून बबन दमोदर हांडे या शेतकऱ्याच्या गाईंच्या गोठ्यात मोठा पाण्याचा प्रवाह शिरल्याने गोठ्यातील तीन गायांपैकी एक गाय जागीच ठार झाली तर इतर दोन गायी वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. दिलीप सुकाळे यांची मॅक्झिमो मालवाहतुक करणारी गाडी ही पाण्यात बुडाली असून पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे ती अद्याप अडकून पडली आहे.