

शंकर कवडे
पुणे: उन्हाच्या चटक्यासह पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने त्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. पुरेशा पाण्याअभावी उत्पादन घटल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक रोडावली आहे. रविवारी (दि. ७ ) राज्यासह परराज्यातून १०० ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. गत आठवड्याच्या तुलनेत ही आवक दहा ट्रकने घटल्याचे सांगण्यात आले. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने सर्व प्रकारच्या फळभाज्यांच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. पुढील काही दिवस फळभाज्यांचे भाव तेजीत राहण्याचा अंदाज व्यापारीवर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, घेवडा २ ते ३ टेम्पो आणि भुईमूग शेंग २ टेम्पो, इंदूर येथून गाजर १० टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार ५ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो, इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची ४० टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ हजार क्रेट, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० कोबी ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर ५ टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, घेवडा, पावटा प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, भुईमूग शेंग ५० गोणी, कांदा सुमारे ७० टेम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील अडते निखिल भुजबळ यांनी दिली.
कोथिंबिरीचे भाव निम्म्यावर
तरकारी विभागात कोथिंबिरीची आवक दुपटीने वाढली आहे. त्यामुळे भावात निम्म्याने घट झाली आहे. तर, कांदापातीला उच्चांकी भाव मिळत आहे. पुदिन्याच्या भावातही मागील आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दोन ते सव्वादोन लाख जुडी कोथिंबिरीची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीला दर्जानुसार
८ ते १५ रुपये भाव मिळत आहे. कांदापातीला उच्चांकी म्हणजे घाऊक बाजारात जुडीला ३० ते ४० रुपये भाव मिळत आहे. मेथीची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असून, ४० हजार जुडी आवक झाली. पुदिन्याच्या भावातही जुडीमगे २ रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात जुडीला दर्जानुसार ८ ते १२ रुपये भाव मिळत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.