

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेसमधील भोजन दरात दहा रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विविध संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने शुल्क वाढीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता जेवणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिफेक्टरीसह वसतिगृहातील मेसच्या दरात १० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे घेण्यात आला होता. परंतु दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही दर वाढ करू नये, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. विविध विद्यार्थी संघटनांनी याबाबत निवेदन दिले होते.
तसेच विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन शुल्कवाढ मागे घेण्यात आली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, उपाहारगृहाची गुणवत्ता राखण्यासाठी सर्व समित्यांचे पुनर्गठण करून कार्यपध्दती विहीत करण्यासाठी डॉ. जोत्स्ना एकबोटे, व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.
भोजन दरवाढ स्थगित होणे हा विद्यार्थ्यांच्या संघटित संघर्षाचा महत्त्वपूर्ण विजय आहे. विविध विद्यार्थी संघटना, विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी सातत्याने मांडलेल्या मागण्यांची दखल अखेर व्यवस्थापन परिषदेला घ्यावी लागली. परवडणारा आणि गुणवत्तापूर्ण आहार हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. भोजनाची गुणवत्ता, प्रमाण आणि विद्यार्थीहिताच्या इतर प्रश्नांवर आमचा संघर्ष यापुढेही कायम राहील.
अभिषेक शेलकर, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती
भोजन दरवाढ मागे घेण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाचा परिणाम आहे. विद्यार्थीहिताला प्राधान्य देणाऱ्या या निर्णयाचे स्वागत करत असून, शिक्षणाशी निगडित प्रत्येक प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या बाजूने आमची भूमिका ठाम राहील.
पवन जाधव, कोषाध्यक्ष, एसएफआय, विद्यापीठ युनिट
भोजन दरवाढ रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त आर्थिक भार टळला आहे. अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती, कुटुंबाची मर्यादित आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या खर्चाचा सामना करत आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा देणारा असून, त्यातून शिक्षण आणि दैनंदिन गरजांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.
प्रतिक्षा नवले, विद्यार्थिनी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ