

Pune University Aditya Abhyankar leave sent on compulsory leave
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आदिवासी विभागाच्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांना अखेर 27 मार्चपासूनच सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भष्टाचाराचा ठपका असलेल्या डॉ. अभ्यंकर यांचे एकतर निलंबन करा किंवा सक्तीच्या रजेवर पाठवा, या दोन मागण्यांवर अडून बसलेल्या अधिसभा सदस्यांसमोर हतबल झालेल्या कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना अखेर निर्णय घ्यावा लागला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेला शुक्रवारी गदारोळातच सुरुवात झाली. विद्यापीठाचे 2017 ते 2024 या कालावधीतील कामकाजाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे तसेच आदिवासी विभागाच्या कामात एक कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी डॉ. अभ्यंकर यांची चौकशी करावी, ही मागच्या अधिसभेतील मागणीच पूर्ण झाली नसल्याचे उघडकीस आल्यानंतर अधिसभा सुरू झाल्यापासूनच अधिसभा सदस्य आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
संबंधित विभागप्रमुखांचे निलंबन करा किंवा सक्तीच्या रजेवर पाठवा, या दोन मागण्यांसाठी अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाला धारेवर धरले होते. या चर्चेत सदस्य विनायक आंबेकर, सचिन गोरडे पाटील, अपूर्व हिरे, बाकेराव बस्ते, ईशानी जोशी, शंतनू लामधाडे, जयंत काकतकर, वैभव दीक्षित, अद्वैत बांबोली आदींनी सहभाग घेतला.
सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन डॉ. गोसावी यांनी दहा मिनिटांसाठी अधिसभा स्थगित केली. त्यानंतर अधिसभेला सुरुवात झाल्यानंतर अधिसभा सदस्यांच्या आग््राही मागणीनुसार डॉ. आदित्य अभ्यंकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय गोसावी यांनी जाहीर केला. या संपूर्ण प्रकरणाची पाचसदस्यीय समितीमार्फत चौकशी करून त्याच्या अहवालानुसार डॉ. अभ्यंकर यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या चौकशी समितीत माजी न्यायमूर्ती, सनदी लेखापाल, अधिसभा सदस्यांचा समावेश असेल, असेही डॉ. गोसावी यांनी जाहीर केले.
आता निर्णय नाही घेतले, तर मी घरी जाईन!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर तसेच पुणे विद्यापीठाच्या कामकाजाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याबाबत अधिसभा सदस्यांनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानुसार कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी निर्णय जाहीर केले. मात्र, हे निर्णय जाहीर करताना ते द्विधा मन:स्थितीत होते. यावर अधिसभा सदस्य विनायक आंबेकर आणि सचिन गोरडे पाटील यांनी मुद्द्याला अनुसरून निर्णय जाहीर करण्याबाबत आग््राही मागणी केली. त्यानंतर डॉ. गोसावी यांनी दोन्ही निर्णय जाहीर करताना, आता निर्णय नाही घेतले, तर मी घरी जाईन, असे मिश्किल विधान केले.